yuva MAharashtra निवडणूक संपताच अजितदादा गट लागला कामाला, आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली !

निवडणूक संपताच अजितदादा गट लागला कामाला, आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ मे २०२४
राज्यातील लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता थांबला आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तब्बल दीड दोन महिने उन्हातान्हात प्रचार सुरू होता. सततचे दौरे, लोकांच्या गाठीभेटी आणि कार्यकर्त्यांना सांभाळणं या सर्व गोष्टींमुळे नेत्यांची चांगलीच दमछाक झाली होती. पण निवडणूक संपल्याने सर्वांनाच हायसं वाटलं आहे. मात्र, असं असलं तरी अजितदादा गट अजूनही थांबलेला नाही. अजितदादा गटाने येत्या रविवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

लोकसभा निवडऩुकीनंतर अजित पवार गट पुन्हा कामाला लागणार आहे. येत्या 27 तारखेला अजितदादा गटाने सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच मित्र पक्षांनी दिलेलं सहकार्य आणि राज्यातील मतदान या विषयावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. सर्वच आमदारांना बैठकीला बोलावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निवडणूक निकालानंतर आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून ही बैठक आयोजित केलीय का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.


मित्र पक्षांनी मतदान केलं का ?

अजितदादा गटाने बोलावलेल्या या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. स्वत: अजितदादा या बैठकीला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. निकालानंतर जो रिझल्ट येईल, त्यानंतर काय रणनीती आखायची हे या बैठकीत ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार गटाला अधिक जागा मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती काय होऊ शकते? यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच, महायुतीतल्या घटकपक्षांनी मतदानात मदत केलं की नाही? याचीही चर्चा या बैठकीत केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभेची गणितं मांडणार ?

दरम्यान, या बैठकीत विधानसभा निवडणुकीवरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं याचा ऊहापोह या बैठकीत होणार असल्याचं बोललं जात आहे.

कोर्टाच्या निकालाची प्रतिक्षा

राष्ट्रवादी कुणाची? पक्षाचं चिन्ह कुणाचं? यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या केसचा निकाल कधीही येऊ शकतो. त्यामुळे निकाल बाजूने आल्यास आणि विरोधात गेल्यास काय करता येईल? याची चर्चाही या बैठकीत होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. बैठकीचा अजेंडा असून स्पष्ट नसला तरी बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.