तापमानाचा पारा दिवसागणिक कमालीचा वाढत असून घामाच्या धारा असह्य करून सोडत आहेत. दुपारच्या वेळी घराबाहेर पाऊल टाकायलाही मन धजावत नाही. डोकेदुखी, मळमळ, उल्टी अशा व्याधी अनेकांना जडल्या आहेत. उष्माघाताने काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. उष्णतेच्या लाटेने केवळ माणूसच नाही, तर प्राणी, पक्षी या सर्वांनाच अक्षरशः बेजार करून सोडले आहे. पाणवठ्याच्या शोधात त्यांचीही वणवण सुरू आहे. उकाडा सहन ना झाल्याने काही पक्षी अचानक जमिनीवर पडत आहेत. गरमीने सजीव सृष्टीच्या अंगाची लाहीलाही केली आहे. ही वस्तुस्थिती केवळ ठरावीक पट्ट्यातील नाही, तर संपूर्ण देशच सध्या भीषण उकाड्याने जळतोय. गेल्या काही वर्षांत तापमानवाढ डोकेदुखी ठरत असताना यंदा उष्णतेने उग्र रूप धारण केले आहे. मराठवाडा, विदर्भ येथे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कमी – अधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती आहे. ग्रामीण पट्ट्यात पाणीबाणीने लोकांचा जीव आटला आहे. पाण्यासाठीची वणवण मात्र थांबण्याचे नाव नाही. त्यांच्या नजरा पावसासाठी आतुरल्या आहेत. जल श्रीमंत तालुक्यांची तहानही यंदा भागली नाही. विहिरींनी तळ गाठला आहे. धरणे, ओढे कोरडेठाक झाली आहेत. जल स्त्रोत आटले आहेत.
उन्हाच्या असह्य लाटा झेलत हंडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ ग्रामीण पट्ट्यातील नागरिकांवर आली आहे. अनेक वाड्या, पाडे, वस्त्या येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. एकीकडे पाण्यासाठी घसा सुकलेला असताना शेजारील दुबईत मात्र पावसाने थैमान घातले. समशीतोष्ण पट्ट्यातील दुबईत भर उन्हाळ्यात कोसळलेल्या दोन-तीन दिवसांतील अवकाळीने तेथील पावसाळ्याचाही विक्रम मोडीत काढला. वरुण राजा एवढा बरसला की ‘दुबई डूब गयी’ असे म्हणण्याची वेळ आली. बुर्ज खलिफासारखी जग, विख्यात पर्यटन स्थळे, विकसित, प्रगत अशी बिरुदावली मिरवणारा हा धनिक देशभर उन्हाळ्यात पाण्याखाली गेला. कोणतीच अत्याधुनिक यंत्रणा या धोक्यापासून त्यांना वाचवण्यासाठी उपयुक्त ठरली नाही. दुबई पाण्याखाली गेलेली असताना इथे भारतात अवकाळीचे संकट यंदा अधिक गडद झाले. वादळी वारा, अवेळी पडलेल्या धारांनी घातलेल्या थैमानाने बळीराजाचा जीव टांगणीला आला. अवकाळीने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हिरावून घेतला. त्यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला. परिणामी वळीवची निकड अधिक भासू लागली. त्याने आपले काम चोख बजावले. वळीवाची धारा शेती, जलसाठा वृद्धी यासाठी निरुपयोगी असतो. मात्र त्याची हजेरी बरेच काही बोलून जात आहे.
उष्णतेच्या लाटा, अवकाळीचा हैदोस ही सारी सृष्टीसाठी धोक्याची घंटा आहे. पर्यावरणातील हे वाढते बदल त्याचीच बांग देत आहेत. ती आपण वेळीच ओळखायला हवी. अन्यथा पुढे परिस्थिती अधिक घातक होईल, कदाचित आपल्या हाती करण्यासारखे काहीच राहणार नाही. संकट आता केवळ दोन हात दूर आहे. उंच इमारती, राजेशाही घरे, प्रशस्त रस्ते हे भौतिक सुख म्हणजेच प्रगती नव्हे. निसर्ग संपन्न असणे हे खरे धन आहे. शिवाय ही प्रगती करताना पर्यावरणाला तर फटका बसत नाही ना याचे भान असायला हवे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाची हानी रोखणे सर्वात महत्त्वाचे आहे.
सर्वात आधी वृक्षतोड थांबवू या. वृक्षतोड करणाऱ्यांवर मनुष्य वधासारखा गुन्हा दाखल व्हायला हवा. या नियमाचे काटेकोरपणे पालन झालेच पाहिजे. कारण आज झाडावर चाललेली कुऱ्हाड उद्या मानवाच्या जीवावर असेल. वृक्षतोडीमुळे अनेक पक्षी, प्राणी निवाऱ्याअभावी स्थलांतर करत आहेत. वृक्षांचे घटते प्रमाण पर्यावरणाची साखळी बिघडवत आहे.
शहरांतील झाडांभोवती काँक्रीटचा फास कचकचून बसला आहे. त्यात त्यांचा श्वास घुसमटतोय, वाढ खुंटते आहे. या काँक्रिटीकरणाच्या विळख्यातून झाडांना मोकळे करूया. झाडे रुजून येणे ही मूळची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण त्याकरिता शहरांत माती शिल्लक आहे कुठे? शहरे म्हणजे सिमेंटची जंगले झाली आहेत. हे आधी रोखूया. कृत्रिम पावसासारखी निसर्गातील ढवळाढवळ थांबायला हवी. निसर्गाच्या प्रक्रियेत माणसाचा हस्तक्षेप नकोच. यंदा मान्सून लवकर आहे. किमान दोन झाडे लावण्याचा आणि मुला-बाळांप्रमाणे त्यांचे पालन-पोषण करण्याचा आपण प्रत्येकाने निर्धार करूया. मुंबईसारखी शहरे हरित करूया. मोठमोठी झाडे हा मुंबईचा श्वास आहे. हा श्वास टिकून राहायला हवा. कारण त्यावच पर्यावरणाचे संतुलन अवलंबून आहे. नाही तर तापमानवाढ, अवकाळी अशी नैसर्गिक संकटे कधी ही सृष्टी गिळंकृत कळतील हे समजणार नाही. वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचा आपण वसा घेऊ या. पर्यावरणाच्या संतुलनासाठी जनमानसातील ही चळवळ होऊदे.