| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ मे २०२४
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरून त्याचा इंजिन व चेसीस क्रमांक खोडून विक्री करणारी टोळी सांगली शहर पोलिसांनी जेरबंद केली. टोळीतील विजय पुंडलिक माने (वय ४०, रा. उमाजी नाईकनगर, दानोळी, ता. शिरोळ), मुऱ्याप्पा नरसिंग हाबगोंडे (वय ३७, रा. जिरग्याळ, ता. जत), अन्सार अक्रम बुराण (वय २१, रा. एपीजे अब्दुल कलाम चौक, कागवाड, जि. बेळगाव) तिघांकडून १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित विजय, मुऱ्याप्पा आणि अन्सार या तिघांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत चोरलेल्या दुचाकी महाराष्ट्र-कनार्टक सीमा भागात बाँड पेपरवर तसेच रोखीने कमी किमतीत विक्री करण्याचा उद्योग सुरू केला होता. दुचाकीच्या इंजिन व चेसीस क्रमांकावर ग्राईंडर फिरवून क्रमांक खोडून दुचाकी विक्री करत होते. तिघांच्या टोळीने अशा अनेक दुचाकी विक्री केल्या होत्या. तिघे जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी सांगलीतील आकाशवाणी केंद्राजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील संतोष गळवे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा तिघे जण मोपेड (एमएच १० एपी ९३५६) घेऊन थांबल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुचाकी चोरून त्या विक्री करत असल्याची कबुली दिली. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खोलवर तपास करत चोरीस केलेल्या आणखी १९ दुचाकी जप्त केल्या. या जप्त केलेल्या दुचाकी कोठून चोरल्या त्याचा तपास केला जात आहे. गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, रफीक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, गणेश कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, उपअधीक्षक जाधव यांनी या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सांगितले. 'शहर पोलिसांनी टोळी पकडून १९ दुचाकी जप्त करण्याची मोठी कामगिरी केली आहे. यापुढेही या पथकाने उकल न झालेले गुन्हे उघडकीस आणावेत. तसेच नागरिकांनी दुचाकीला डबल लॉक, सुरक्षित ठिकाणी पार्किंग करावी.'
-संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली.