| सांगली समाचार वृत्त |
जालना - दि. ११ मे २०२४
जालना लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र आज 9 मे रोजी शहरातील मुख्य वस्तीमध्ये नूतन वसाहत भागात कचराकुंडीमध्ये शेकडो मतदान कार्डं नागरिकांना आढळून आली आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना व निवडणूक अधिकार्यांना व जिल्हाधिकार्यांना दिली, यावेळी अधिकार्यांनी तत्काळ येऊन ही मतदान कार्डं जप्त केली आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जालना लोकसभा निवडणुकीतील मतदानाला अवघे चार दिवस बाकी असताना जालना शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, जालना शहरातील नूतन वसाहत येथे बोगस मतदान कार्ड हे कचराकुंडी सारख्या ठिकाणी आढळून आले आहे, ते मला तुमच्या त्या व्हिडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळाले. असा प्रकार असेल तर ही फार गंभीर बाब आहे. लवकरच तुमच्या या क्लिपचा संदर्भ घेऊन आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना जाऊन भेटून याविषयीची तक्रार देतो. उद्या अशा पद्धतीचे बोगस कार्ड घेऊन कोणीही मतदार मतदानाला येता कामा नये. आमच्या मूळ मतदाराचे मतदान करून कोणीतरी बोगस येऊन मतदान करून जायचा असेही होता कामा नये. म्हणून त्या दृष्टीने जे मतदान केंद्राध्यक्ष किंवा अधिकारी असतात त्यांना याच्यावर लक्ष द्यावे लागेल की जे आणलेले मतदान कार्ड किंवा आलेल्या वोटर या दोन्हीच्या फोटोमध्ये आणि चेहऱ्यामध्ये साम्य आहे की नाही याची सुद्धा पडताळणी करण्याची गरज अस मला वाटतं, अशा पद्धतीची तक्रार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्याकडे करणार असल्याची माहिती डॉ. कल्याण काळे यांनी दिली.