yuva MAharashtra शूर धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल समाजात आजही आकस का ?

शूर धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल समाजात आजही आकस का ?



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १४ मे २०२४

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आज शतके उलटली परंतु अजूनही त्यांच्याविरोधी हिरीरीने बोलले जाते. यामागे काय कारण असावे? संभाजी महाराजांची प्रतिभाशक्ती, लेखनशैली, युद्धकौशल्ये, बाणेदारपणा हे सर्वच वाखाणण्याजोगे आहे. असे असतानाही आज समाजात काही प्रमाणात काही विशिष्ट गटांकडून शंभूराजांची प्रतिमा अकारण मलीन केली जाते. मग याची सुरुवात कुठून झाली असावी? आजही शंभूराजांच्या घटनेनंतर औरंगजेबाचं कौतुक करण्याचा सपाटाच आपल्याकडे समाजमाध्यमांवर सुरु आहे असे दिसते. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आज संभाजी महाराजांच्या जन्मदिनी या सोशल मीडिया गप्पांच्या मागे असलेले धाराप्रवाह मला शोधायला आवडतील.

मल्हार रामराव चिटणीस यांनी शंभू राजांच्या मृत्यूनंतर एक बखर लिहिली. किती? तब्बल १२२ वर्षांनी. आपले पूर्वज बाळाजी आवजी आणि त्यांचे पुत्र आवजी बाळाजी यांना हत्तीच्या पायदळी तुडवून मारल्याचा राग या चिटणीसांच्या मनात होता. या सूड बुद्धीने त्यांनी एकांगी बखर लेखन केले. या बखरीपासून शंभू राजांची प्रतिमा मलिन व्हायला सुरुवात झाली अशी एक शक्यता सुप्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी त्यांच्या संभाजी कादंबरीमागच्या टिपणात मांडली आहे. त्यानंतर आपण येतो रियासतकार सरदेसाई यांच्याकडे. खरेतर त्यांच्या प्रामाणिक लेखनावर कोणताही संशय घेण्याचे कारण नाही. परंतु ज्या साधनांचा आधार इतिहास पुनर्लिखित करताना घेतला जातो ती साधने जर अव्यवस्थित असतील तर पुढची घडी नेमकी कशी पडावी?

बरं आता आपण हा सगळा लिखित इतिहास मागे ठेऊ आणि कागद पत्रांकडे येऊ. अगदी राजगडावरच्या कैदेचेच घ्या. ज्या नजर कैदेबद्दल चवीने सांगितले जाते त्याविषयी एकही कागदपत्र उपलब्ध नाही. कुरुंदकरांनी मात्र पुढे आश्वासक इतिहास मांडायला सुरुवात केली. ही नवी वाट दिसू लागल्यानंतर मात्र अनेक इतिहासकारांनी हा विषय पुन्हा पुन्हा मांडायला सुरुवात केली. श्रीमान योगींच्या प्रस्तावनेत नरहर कुरुंदकरांनी संभाजीची व्यथा मांडली आणि त्यानंतर पागडी यांनीही या नव्या माहितीस दुजोरा दिला. संभाजी महाराजांच्या बदफैलीपणाबद्दलचा पहिलाउच्चर १६९० नंतर झाला. शंभूराजांच्या मृत्यूनंतर. याचाच अर्थ असा लावा येतो, संभू राजांच्या सडेतोड वागण्याने आणि सत्यप्रियतेने दुखावलेगेलेले काही दरबारी किंवा त्यांचे वंशज यांनी केवळ बदनामीसाठी अशा अफवा पसरवल्या असण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

विश्वास पाटील संभाजीच्या परिशिष्टत लिहितात, "संभाजी राजांच्या अन्नात वारंवार विषप्रयोग केला गेला. परंतु या हल्लेखोरांवर राजांनी वारंवार दया दाखवून व स्पष्ट समाज देऊनही हाच प्रयत्न पुन्हा केला गेला. त्यावेळी संबंधितांना शिक्षा देणे अनिवार्य होते. या शिक्षेचा मोबदला म्हणून संबंधितांच्या वंशजांनी महाराष्ट्राच्या माथी मारलेले शंभूराजांचे खोटे चरित्र. 

३ एप्रिल १६८० ला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर मोठं संकट आलं होतं. जवळ जवळ ५ लाखाची फौज घेऊन औरंगजेब चालून आला. त्यावेळी पुढील १० वर्ष महाराष्ट्र एकहाती सांभाळण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनीच केले. ते सांभाळताना औरंगजेबासारख्या दुष्टाशी लढून पुन्हा हौतात्म्य पत्करणारा राजा म्हणून त्यांच्याबद्दल एक आपलेपणा आहे. प्रेम आहे. आणि म्हणूनच त्यांची ओढ महाराष्ट्राला अजूनही वाटते. औरंगजेबाबद्दल मात्र लोकांच्या मनात एवढे प्रेम कोठून येते कळायला मार्ग नाही.

काही क्रूर प्रवृत्तीच्या लोकांनी असा सपाटा चालवलेलाच आहे. मुळात औरंगजेब हा दुष्टांचाच शेहेनशाह होता असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. ज्यांनी आपला पिता शहाजहान याचे पाणी तोडले, आपला मोठा भाऊ दाराचे मुंडक छाटून आपल्या हात घेऊन बराचवेळ पारखत बसला होता. आपल्या तीन भावांची त्याने निर्घृण हत्या केली. दाराच्या दोन बेगमांशी सुद्धा त्याने जुलुमाने लग्न केले होते. त्याचा हा सर्व इतिहास पाहता त्याला हिरो करायचे काहीही कारण नाही. तो दुष्ट होता, क्रूरकर्मा होता हे त्याने त्याच्या कर्मानेच जाहीर केले आहे. आणखी एक, जर लोकांना हिंदू आणि मुसलमान बंधुत्वाची किंवा ऐक्याची प्रतीकं हवी असतील, तर ती अनेक आहेत. त्यांच्याकडे आपण पाहत नाही आणि या दुष्टांनाच सुष्ट ठरवत जातो. असे अनेक सरदार होते, अफजलखानाचेही आणि औरंगजेबाचेही काही सरदार शिवाजी राजांना, शंभुराजांना सामील होते. काही उघडही सामील होते. त्यांनी बरीच मदत केली आहे. ते जरी मुसलमान असले तरीही ते हिंदवी स्वराज्याचे मित्र होते. त्यांच्या मैत्रीचा सन्मान जरूर केला जावा. परंतु मुद्दामहून अफजलखान किंवा अवरंगजेबाचा गौरव करण्यामागे अर्थ नाही. जसे की रुस्तम ए जमा आहे, हा विजापूरचा सरदार होता. त्याचे वडील रणदुल्ला खान म्हणजे साताऱ्याजवळील रेहमतपूर येथील होत. रेहमतपूर त्यांच्या नावाने बांधलेले आहे. या रणदुल्ला खानाने शिवाजी राजांचे पिता शहाजीराजांना खूप मदत केली. बंगळुरू जवळचा किल्ला त्यांना राहायला दिला. हा किल्ला इतका मोठा होता की त्याला दिल्ली दरवाजासारखे नऊ दरवाजे होते. तिथल्याच एका केम्पेगौडा नावाच्या राजाकडून ६० हजार फौजेनिशी वर्षभर लढाई करून जिंकलेला तो किल्ला होता. तो जसाच्या तसा शहाजी राजांकडे त्यांनी सुपूर्द केला. पुढच्या काळात शिवाजी महाराजांची मैत्री त्यामुळे जुळलेली आहेच. डिसेम्बर १६५९ साली झालेल्या लढाईत शिवाजी राजांनी रुस्तम ए जमाला जाऊ दिले. याची वर्णने शिवभारतात देखील आहेत. पण हे सोडल्यास शंभूराजांचा इतिहास जाज्वल्यच आहे. तो बखरींतून वाचण्यापेक्षा आता कादंबऱ्यांतूनच वाचायला हवा.