| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीत वादाची ठरलेल्या सांगलीच्या जागेवरून अजूनही वाद संपलेला नाहीय. यातच अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजनाला हजेरी लावल्याने ठाकरे गटाने यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेस गद्दार आहे. असा घणाघात आता ठाकरे गटाचे सांगली जिल्ह्याध्यक्ष संजय विभुते यांनी केला आहे.
कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुक प्रचारासाठी राबलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजन आयोजित केलं होतं. या स्नेहभोजनाला कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह कॉंग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना देखील निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. त्यावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वावर आम्ही काम करत आहोत. तर विशाल पाटील हे प्रदेश कॉंग्रेसचे अजूनही उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा कॉंग्रेसला मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. आगामी काळातील विधानसभा निवडणुकांमध्येही झपाट्याने कार्यकर्त्यांनी काम करावे या उद्देशाने हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पृथ्वीराज पाटील यांनी दिले आहे.
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीपुर्वीपासूनच कॉंग्रेसचा आघाडीच्या उमेदवाराला विरोध होता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेस गद्दार आहे. याचा पुरावा या स्नेहभोजनातून दिसून येतो. असा घणाघात आरोप ठाकरे गटाने केलाय. तर कॉंग्रेसने तात्काळ शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि बंडखोर विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे.