| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ मे २०२४
भारतीय जनता पक्ष आणि सांगलीच्या खासदाराच्या दबाव तंत्राला झुगारून जनतेने मला संसदेत पाठवण्याचा निर्धार केला आहे. या झुंडशाही विरोधातील लहाईत जनता माझ्यासोबत असल्याने लोकसभा निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास अपक्ष उमेट्कर विशालदादा पाटील यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता समारंभ वेळी ते बोलत होते. विशाल पाटील म्हणाले की, जनतेच्या आग्रहाने उमेदवारी अर्ज दाखल केला, प्रचारासाठी शहरी आणि ग्रामीण भागाचा दौरा करताना जनतेचे प्रेम मिळाले. या प्रेमातून आपण कधीच उतराई होऊ शकणार नाही. गेल्या दहा वर्षात सांगली जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. भाजपचे खासदार निष्क्रिय ठरल्याने जनतेतून उठाव झाला आहे. सर्वसामान्यांच्या विकासाचे स्वप्न दाखवून खासदार झालेल्या संजय काकांनी जनतेच्या आशा आकांक्षावर पाणी फिरण्याचे काम केले आहे. जनतेच्या विकासाऐवजी स्वतः चा विकास करण्यात मंत्र असलेल्या विजय निश्चित आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपला पराभव समोर दिसू लागल्याने अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. पण मी काँग्रेसचा आणि काँग्रेस माझी आहे. गेली १० वर्ष राज्यात काँग्रेस बाढवण्याचे काम वसंतदादा घराण्याने केले आहे. माझ्या रक्तात वसंतदादांचा आणि काँग्रेसचा विचार असल्याचे विशाल दादा म्हणाले.
तासगाव आणि यशवंत कारखाना डबघाईस आणून या कारखान्याच्या पन्नास हजार सभासदांच्या अन्नात माती कालवण्याचे पाप खासदारांनी केले आहे. खासदारांचे पितळ उघडे झाले आहे. त्यात आता झुंडशाही, दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. खासदारांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. या झुंडशाही विरोधात जनतेनेच वज्रमुठ आवळली आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.
सलगरे येथील दलित समाजाच्या हक्काच्या जागेवर मल्टी लॉजिस्टिक पार्क करण्याचा घाट घालून गरिबांना आयुष्यातून उठवण्याचा डाव कोणाचा होता हे जनतेला माहित आहे कवलापूर विमानतळाची १६० एकर जागा २०१७ मध्ये घशात घालण्याचा प्रयत्न कोणी केला हेही जनतेला कळले आहे त्यामुळेच जनता माझ्यासोबत असल्याचेही विशाल पाटील म्हणाले.