yuva MAharashtra वीज बिलात वाढ झाल्याने ग्राहक संतप्त !

वीज बिलात वाढ झाल्याने ग्राहक संतप्त !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ मे २०२४
वाढत्या महागाईने नागरिक हैराण झाले आहेत. त्यावर महावितरणने वीज बिलात वाढ करून अतिरिक्त सुरक्षा रक्कम लादून ग्राहकांना विजेचा झटका दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार ही वाढ करण्यात आली आहे. विविध संघटनांनी वीज दरवाढीचा निषेध केला आहे. याकडे दुर्लक्ष करून वीज दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीची याचिका मंजूर केल्यानंतर महावितरणने वीजदरात मोठी वाढ केली आहे. प्रति युनिट 40 पैसे प्रमाणे देयकात वाढ केली आहे. भारतात सर्वाधिक महाग वीज महाराष्ट्रात आहे, हे उल्लेखनिय!

दोन वर्षांत वीज बिलात 20 ते 22 टक्क्ययांनी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम कुटुंब, व्यवसाय, शेतकरी आणि उद्योगांवर झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे विजेचा वापर वाढला आहे. अशा स्थितीत वीज दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.


आता महावितरणकडून पुर्व कल्पना न देता विजेच्या खांबावर मिटर बसवण्याचे काम चालू आहे. वीज विभाग सिक्युरिटीच्या माध्यमातून दर वर्षी पैसे घेते. अशा स्थितीत कोणाची आणि कोणती सुरक्षा? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. दरवर्षी वीज देयकात ग्राहकांच्या हाती सुरक्षा रक्कम दिली जाते. मीटर घेताना सर्व शुल्क घेतले जाते. त्यानंतर सुरक्षा रक्कम वर्षातून एकदा घेतली जाते. वीज बिलामध्ये विविध प्रकारची रक्कम जोडून बिल दिले जाते.