पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवितास धोका असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. “संजय राऊत यांनी अहमदनगर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना दफन करणार असल्याची दिलेली धमकी सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे”, असं भाजपने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. याबाबत भाजप नेत्यांकडून अमरावती, मुंबई, बीडसह राज्यात विविध ठिकाणी संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
“शिवसेना (उद्धव बाळासाहेब टाकरे गट) नेते संजय राऊत यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. शिवाय, पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा श्री. राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे”, असा दावा भाजपने पत्रात केला आहे.
‘राऊतांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधानांच्या जीवितास धोका’
“संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे हे उघड आहे आणि या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या या वक्त्याव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उच्च मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होते”, असा दावा पत्रात करण्यात आला आहे.
“अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. मी निवडणूक आयोगाला आणि संबंधित अधिकारी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती करतो. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद”, असं भाजपने पत्रात म्हटलं आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यांनी हे पत्र पाठवलं आहे.