| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ६ मे २०२४
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारात दिग्गज नेते मंडळी उतरले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मराठी अभिनेत्रींने काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर घणाघात टीका केली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने राहुल गांधींविरोधात पोस्ट केली आहे. राहुल गांधींचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत मेघाने लिहिलं आहे, 'राहुल गांधींना पाठिंबा देणाऱ्यांची लाज वाटते. राहुल गांधी मी तुमचा तिरस्कार करते. माझा देश सोडा आणि नरकात जा.' असे तिने म्हटले आहे. मेघाची ही संतप्त पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
मेघाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या हा राहुल गांधींचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. ३६ सेकंदाच्या या व्हिडीओत, राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे. यावेळी आदरार्थ त्यांना पगडी व शाल दिली. याशिवाय एक नेत्याने राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट म्हणून दिला. राहुल यांनी शिवरायांचा पुतळ्यासह फोटो काढला, पण तो स्वीकारला नाही. मग संबंधित नेत्याने महाराजांचा पुतळा टेबलावर ठेवला. पण राहुल गांधींनी तिथूनही शिवरायांचा पुतळा उचलायला सांगितल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. राहुल गांधींचं हेच कृत्य पाहून मेघाने संतप्त पोस्ट लिहिली आहे.
दरम्यान, अभिनेत्री मेघा धाडे नेहमी सोशल मीडियावर आपली परखड मत व्यक्त करत असते. गेल्या वर्षी जून महिन्यात मेघाने भाजपात प्रवेश केला होता. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिने भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे.