yuva MAharashtra वादळी वाऱ्याने दाेनशे विद्युत खांब पडले, 8 दिवसांपासून जतचा पूर्व भाग अंधारात !

वादळी वाऱ्याने दाेनशे विद्युत खांब पडले, 8 दिवसांपासून जतचा पूर्व भाग अंधारात !



| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. ३१ मे २०२४
जत तालुक्यात वादळी वाऱ्याने खाजगी व शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचे तब्बल 200 खांब पडल्याने आजही जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे. वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे. तेथेसुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संख महावितरण समोर आहे.

जत पूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्वरत करावा यासाठी अन्य तालुके व जिल्ह्यातून अधिकारी, कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे. हभप तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या.


या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला. आठ दिवस झाले लाईट गायब आहे, हाल सुरू आहेत अशा तक्रारी केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी जत पूर्व भागात २०० हुन अधिक पोल वादळी वाऱ्याने कोलमडून पडले आहेत. प्रथम मेन लाइनचे पोल उभा केले जात आहेत. ते होताच अन्य पोल उभे केले जातील.कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने वेळ लागत असल्याचे हभप तुकाराम बाबा महाराज यांना सांगितले.