| सांगली समाचार वृत्त |
राजकोट - दि. २६ मे २०२४
गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतेक जण लहान मुलं आणि महिला आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये ही आग लागली आहे. हा गेम झोन एका मॉलमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. आतमध्ये आणखी काही मुलं अडकल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग एवढी भीषण आहे की एक किलोमीटर लांबपर्यंत आगीचे लोट दिसत होते.
फायर ब्रिगेडकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकोटमध्ये लागलेल्या या आगीचा व्हिडिओही समोर आळा आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण गेम झोन आगीमध्ये भस्मसात झाला आहे. शाळा-कॉलेजना सुट्टी असल्यामुळे गेम झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर मुलं येतात, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाही तिथे बरीच लहान मुलं होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
राजकोटचा हा गेम झोन एका टीन शेडच्या खाली सुरू होता. ही आग नेमकी कशाने लागली याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेन बघेल यांनी या अपघाताबाबत यंत्रणांकडून माहिती घेतली आहे. आगीमध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपाचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.