| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३१ मे २०२४
भारतीय सीमेवर दुर्गम भागात चीनने चार वर्षांत तब्बल 624 गावे वसवल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला असून त्या भागात चीन आपल्या सैन्याचे जाळे पसरवत असल्याने धोका वाढला आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असतानाही सरकारला त्याचा मागमूसही कसा नाही ? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर इंटरनॅशनल ॲण्ड स्ट्रटेजिक स्टडीजचा अहवाल 16 मे रोजी प्रसिद्ध झाला. त्यात चीनने वसवलेल्या गावांच्या सॅटेलाईट इमेजही प्रसारित केल्या आहेत.
हिमालयाच्या दुर्गम भागात गावांची निर्मिती
2018 ते 2022 या चार वर्षांत चीनने या भागात शियाओकांग (सर्व सुविधांनी सज्ज) गावांची उभारणी केली आहे आणि आणखीही गावांची निर्मिती केली जात आहे. दुर्गम आणि निर्जन भागात ही गावे वसवली जात आहेत. हिंदुस्थानसाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
अरुणाचल प्रदेशजवळ चार वेगवेगळ्या ठिकाणी चीनने गावे वसवली आहेत. दुहेरी वापर करता येईल, अशा पद्धतीने ही मॉडेल गावे वसवली गेली आहेत. यात याराओ तसेच जुआंगनान, माजिदुनकुन आणि कुइकियोंगमेनमध्ये तर सैन्यासाठी लागणा-या सुविधाही उभारण्यात आल्याची गंभीर बाब अहवालात नमूद करण्यात आली आहे.
भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर चीन सातत्याने दावा सांगत आला आहे. त्याबाबत भारताकडून ठोस भूमिका घेण्यात आली नसताना चीनचे धाडस वाढतच चालले आहे. त्यातूनच चीनकडून सीमेवर गावे वसवण्याचे पाऊल उचलले गेले आहे.
याराओजवळ गेल्या वर्षी चीनने पक्का रस्ता आणि दोन हेलिपॅडची उभारणी केली. याराओ 3 हजार 900 मीटर उंचीवर आहे. अत्यंत प्रतिकूल हवामान असतानाही चीनने तिथे इमारती उभारल्या आहेत.
ग्रे झोनमध्ये ही गावे वसवण्यात आली आहेत. या गावांमध्ये छुप्या पद्धतीने सैनिक तैनात ठेवले जाऊ शकतात, असा धोका संरक्षण तज्ञांनी व्यक्त केला आहे.