| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. २३ मे २०२४
देवदर्शन घेऊन परतताना पांगरी (ता. माण) जवळ चारचाकी मोटार ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. यात सहा वर्षांच्या बालिकेसह वृद्ध जागीच ठार झाला, तर एका मुलीचा उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी रात्री हा भीषण अपघात झाला.
मृत व जखमी सांगली जिल्ह्यातील भिकवडी बुद्रुक (ता. खानापूर) येथील एकाच कुटुंबातील आहेत. संपत करू तामखडे (वय ६५), आर्या बाबूराव तामखडे (वय ६), धनश्री बाबूराव तामखडे अशी मृतांची नावे आहेत. मालन संपत तामखडे, नीलम बाबूराव तामखडे, विद्या राहुल तामखडे, धनश्री हिंदवी तामखडे हे जखमी आहेत.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भिकवडी बुद्रुक (ता. खानापूर, जि. सांगली) येथील तामखडे कुटुंबीय मंगळवारी चारचाकीने धुळदेव (ता. फलटण) येथे देवदर्शनासाठी आले होते. दिवसभरात देवदर्शन उरकून संध्याकाळी ते चारचाकी मोटारीतून गावी परतत होते. रात्री आठच्या सुमारास त्यांची मोटार (एमएच ११ बीएच १५३९) पांगरी (ता. माण) गावाजवळ आली असता रस्त्यावर नंबरप्लेट नसलेली व विहिरीच्या यारीचे साहित्य असलेली ट्रॅक्टर ट्रॉलीसह अंधारात उभी होती. फलटणच्या दिशेकडून दहिवडीकडे निघालेली चारचाकी मोटार बंद लाइट असलेल्या ट्रॉलीला मागून धडकली.
या धडकेत ट्रॉली निखळून विहिरीच्या यारीचे लोखंडी खांब चारचाकी मोटारीच्या डाव्या बाजूला घुसले. यात पुढे बसलेले संपत तामखडे व आर्या तामखडे हे जागीच ठार झाले, तर आणखी एका मुलीचा (नाव समजले नाही) उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. या अपघातात मालन तामखडे, नीलम तामखडे, विद्या तामखडे, धनश्री तामखडे या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने दहिवडी व सातारा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान अपघातानंतर वाहतूक खोळंबून रस्त्याच्या दुतर्फा लांब अंतरापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.
जेसीबीच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला
या अपघातात चारचाकी मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता, की ट्रॉलीतील लोखंडी साहित्य चारचाकी मोटारीत आरपार घुसल्याने जेसीबीच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून मृत व जखमींना बाहेर काढावे लागले.
ट्रॉलीला नव्हते रिफ्लेक्टर
रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर, लाइटही नव्हत्या. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांना अंधारात हा ट्रॅक्टर व ट्रॉली दिसत नव्हती.