| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ मे २०२४
कोणतेही मंगलकार्य असो त्याला मुहूर्त फार महत्त्वाचा असतो. त्यात विशेषतः लग्नसोहळ्यात मुहूर्त कटाक्षाने पाळण्यावर वधू-वर मंडळींचा भर असतो. यंदा मे आणि जून महिन्यात दोनच मुहूर्त सोडले तर २९ जूनपर्यंत विवाहासाठी मुहूर्तच नाहीत. त्यामुळे लग्नसराईला ५८ दिवसांचा ब्रेक लागला आहे. त्याचा बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम होणार आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एप्रिल, मे या दोन महिन्यात मोठी उलाढाल होते. आता बाजारपेठांमध्ये दुकाने सजली आहेत; मात्र ग्राहक नाहीत अशी स्थिती आहे.
कोणतेही मंगलकार्य असो त्याला मुहूर्त फार महत्त्वाचा असतो. त्यात विशेषतः लग्नसोहळ्यात मुहूर्त कटाक्षाने पाळण्यावर वधू-वर मंडळींचा भर असतो. या वर्षी लग्नसराईची धामधूम सुरू आहे. सोयरिक जुळवणे आणि विवाह आनंदाने पार पाडण्यासाठी वधू-वरांचे आई-वडील तयारी करू लागले आहेत; परंतु यंदा वैशाख महिन्यात गुरू आणि शुक्राचा अस्त असल्याचे सांगितले जात असल्यामुळे विवाह जमवण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे जवळपास ५८ दिवसांचा खंड पडणार आहे.
२ मे २०२४ या तिथीनंतर सरासरी दोन महिने विवाह मुहूर्त दिले गेले नाहीत. २ मे ते २९ जूनदरम्यान लग्नमुहूर्त नाहीत तर काही पंचांगात मात्र धर्मग्रंथाचा आधार घेत अडचणीच्याप्रसंगी गुरू, शुक्र अस्तामध्येसुद्धा विवाह मुभा दिल्याचे सांगितले आहे. लग्न ठरलेल्या मुलामुलींमध्ये क्रेझ असते ती युनिक शॉपिंगची. अर्थातच यामध्ये साड्यांच्या कलरपासून ते ज्वेलरीच्या फॉर्मपर्यंत चॉईसला वाव असलेल्या वस्तूंचा शोध घेतला जातो. मुलांनाही सध्या वेडिंग ड्रेसमध्ये वेगळे काही आहे का, याचे वेध लागलेले असतात.
लग्नाच्या निमित्ताने असलेल्या प्रत्येक इव्हेंटसाठी हल्ली नवरा-नवरीच्या ड्रेसचे मॅचिंग किंवा फॅमिली कलर्स निवडले जातात. आजकाल दोघांचे वेडिंग कलेक्शन एकमेकांना पूरक असण्याचा ट्रेंडही आहे तर गोल्ड ज्वेलरीपेक्षा डायमंड, स्टोन आणि कुंदन ज्वेलरींमध्येही खास वेडिंग कलेक्शन आले आहे. लग्न हा आयुष्यभर लक्षात राहणारा सोहळा असल्यामुळे जे करायचे ते चांगले या मानसिकतेमुळेच लग्नासाठी खरेदी केली जाते; मात्र मुहूर्त नसल्यामुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे.
मे आणि जून महिन्यात दरवर्षी चांगली खरेदी होती; पण यावर्षी जूनपर्यंत विवाह मुहूर्त नाही त्यामुळे खरेदी मंदावली आहे. रमजान ईदला चांगली खरेदी झाली. त्यानंतर व्यवसाय ठप्प आहे.