| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ मे २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत करण्याचे काही जणांचे डावपेच आहेत. विशाल पाटील यांना भाजपच रसद पुरवत असल्याचा गंभीर आरोप करत विश्वजीत कदम हे वाघ आहेत की नाहीत हे चार जूनलाच कळेल अशी टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी येथे आज माध्यमांशी बाेलताना केली.
खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीत आले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी पंतप्रधान माेदी, प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. तसेच राऊत यांचा विश्वजीत कदम यांच्यावर देखील काही प्रमाणात राेष असल्याचे दिसून आले.
खासदार संजय राऊत यांना विश्वजीत कदम यांच्या सांगलीत मी वाघ असल्याच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी सांगलीचा एकमेव वाघ हे वसंतदादा पाटीलच होते असे म्हटलं. वाघ काय असताे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार हे आम्ही पाहिले आहेत. वाघाची रचना त्याचा स्वभाव वेगळा असताे.
तर त्या वाघाचा आम्ही सत्कार करू
संजय राऊत पुढं बाेलताना म्हणाले विश्वजित कदम वाघ आहेत की नाही हे 4 जूनला कळेल. स्वतःला वाघ सिद्ध करायचे असेल तर चंद्रहार पाटील यांना विजयी केले पाहिजे. 4 जून नंतर त्या वाघाचा आम्ही सत्कार करू असेही राऊत यांनी विश्वजीत कदम यांच्याविषयी बाेलताना नमूद केले.