yuva MAharashtra अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले होते मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले होते मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ मे २०२४
एका मोठ्या राजकीय मुद्द्यावरून, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केला की, मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबच्या बंदुकीने नव्हे तर "आरएसएसशी संबंधित" पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीने झाली होती असा आरोप केला आहे. 

मुंबई दहशतवादी खटल्यातील सरकारी वकील उज्वल निकम यंदा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवत असल्याने पुन्हा एका 26/11 चा हल्ला, अजमल कसाब बिर्याणीचा वाद आणि त्या खटल्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंच्यासंबंधी आरएसएस वर केलेल्या आरोपांमुळे, करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांच्या मनाच्या मोठेपणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


काय आहे प्रकरण?

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर पाकिस्तानातून समुद्रामार्गे आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या दिवशी पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या 10 दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट आणि गोळीबार करून मुंबई हादरवली होती.

या दहशतवादी हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि 300 हून अधिक जण जखमी झाले होते.

तर, हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी शहिद झाले होते.

करकरेंच्या पत्नीच्या मनाचा मोठेपण

26/11 च्या या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांनी शहीद झालेल्या मुंबई पोलिसांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये मदत जाहीर केली होती. तसेच त्यांनी मुंबईत शहीद पोलिसांच्या कुटुंबियांची भेटही घेतली होती.

मात्र, त्यावेळी दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख असलेल्या कविता करकरे यांनी नरेंद्र मोदी यांनी देऊ केलेली एक कोटी रुपयांची मदत नाकारत मनाचा मोठेपणा दाखवला होता. त्यांच्या या कृतीचे देशभरातून कौतुक झाले होते. इतकेच नव्हे तर त्यावेळी कविता करकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह कोणत्याही राजकीय नेत्याला भेट घेतली नव्हती.

26/11 च्या हल्ल्यावेली 54 वर्षांचे असलेले हेमंत करकरे IPS च्या 1982-बॅचचे महाराष्ट्र-केडरचे अधिकारी होते. तसेच ते महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) नेतृत्व करत होते. 

केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत येण्यापूर्वी करकरे यांनी 'रॉ'च्या संशोधन आणि विश्लेषण शाखेत काम केले होते.

२६/११ च्या हल्ल्यापूर्वी त्यांनी ठाणे, वाशी आणि पनवेलमधील बॉम्बस्फोटांची मालिका आणि २९ सप्टेंबर २००८ रोजी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला झालेल्या बॉम्बस्फोटासारख्या अनेक संवेदनशील प्रकरणांचा तपास केला होता, ज्यात मालेगाव येथे सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि १०१ जण जखमी झाले होते. 2009 मध्ये, त्यांना मरणोत्तर अशोक चक्र, भारतातील सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार देण्यात आला होता.