| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ मे २०२४
मुंबईमध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे होर्डिंग कोसळलं. घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 14 जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. दुर्घटनेच्या 24 तासांनंतरही पेट्रोल पंपावर होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्यानं पेट्रोल पंपवर असलेला होर्डिंगचा ढाचा बाजूला करण्यात येत आहे.
घाटकोपरच्या या पेट्रोल पंपावर दुर्घटना घडली तेव्हा 56 वर्षांचे संपत राजगुरूही होते. तब्बल दोन तास संपत राजगुरू होर्डिंगखाली होते, सुदैवाने त्यांच्या अंगावर साधा ओरखडाही पडला नाही. ज्या होर्डिंग दुर्घटनेने 14 मुंबईकरांचा जीव घेतला, त्यात संपत राजगुरू बचावले आहेत. दोन वर्षांपूर्वी संपत राजगुरू यांनी नवीन गाडी घेतली होती. या गाडीचा मात्र दुर्घटनेमध्ये चुराडा झाला आहे. होर्डिंगखाली अडकले असताना नेमंक काय काय घडलं, याची आपबिती संपत राजगुरू यांनी सांगितली आहे.
'मी चार वाजण्याच्या सुमारास तिथे उभा होतो, वादळ आणि पाऊस यायला सुरूवात झाली. पाऊस सुरू झाला तेव्हा मी गाडीतच बसलो होतो. बाजूचं शेड तुटायला लागलं होतं, मी म्हणलं फायबरचं आहे, आपल्याला काही होणार नाही, म्हणून मी बसून राहिलो. नंतर ते होर्डिंग पडलं, मला माहितीच नाही माझ्या अंगावर ते होर्डिंग पडलं म्हणून. गाडीच्या पाठीमागच्या सीट उंच होत्या, तिथे पडल्यामुळे मला काही कळालं नाही, त्यामुळे मी जागेवर बसून होतो,' असं संपत राजगुरू म्हणाले. 'मी दोन तास एकाच जागेवर बसून होतो. दोन तासांनी फायर ब्रिगेडवाले आले, ते आवाज देत होते, कोण आहे का म्हणून. मी इकडे अडकल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी काच फोडली आणि मला काचेतून बाहेर काढलं.
मी गाडी पेट्रोल पंपावर थांबवली होती. मला सीएनजी भरायचा होता. पाऊस येत असल्यामुळे मी गाडीतून बाहेर पडलो नाही. दोन तास दबून होतो, मला हलताही येत नव्हतं. माझी नसही पकडली गेली आहे,' असं संपत राजगुरू यांनी सांगितलं.