| सांगली समाचार वृत्त |
बीड - दि. २९ मे २०२४
एखादी गोष्ट आपल्याला मिळवायचीच आहे असा पण केला आणि सातत्याने प्रयत्न करूनही त्यात यश येत नसेल तर ? आपण त्या गोष्टीसाठी कितीवेळा प्रयत्न करू ? एकदा..दोनदा.. तीनदा... की पाचदा ? सातत्याने जर अपयश येत असेल तर ती गोष्ट नशिबात नाही असं समजतो आणि आपण त्याचा नाद सोडतो. पण बीडच्या एक पठ्ठ्या मात्र 'हार नहीं मानूंगा' असा पण करून अकरावेळा प्रयत्न करून दहावी उत्तीर्ण झाला. कृष्णा मुंडे असं त्याचं नाव असून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर गावकऱ्यांनी तर वाजत गाजत त्याची मिरवणूकच काढली.
कृष्णा मुंडे यांनी दहावी उत्तीर्ण होण्यासाठी या आधी गेल्या पाच वर्षात दहा वेळा प्रयत्न केला. पण त्याला काहीच यश येत नव्हतं. पण तरीही हा पठ्ठ्या काही थांबला नाही. त्याने आता 11 व्या वेळी परीक्षा दिली आणि यश मिळवलं. कृष्णा मुंडेच्या वडिलांनी तर गावभर साखर वाटली. तर गावकऱ्यांनी थेट वाजत गाजत मिरवणूक काढली. कृष्णाच्या गळ्यात मोठा हार घालण्यात आला तर डोक्यावर फर टोपी घालण्यात आली.
मुलागा नापास झाला म्हणून त्याला रट्टे न देता त्याला प्रयत्न करण्यासाठी कृष्णाच्या वडिलांनी पाठबळ दिलं. कृष्णा 10 वेळा नापास झाला खरा पण त्याच्या वडिलांनी त्याला खचू दिलं नाही. कृष्णाच्या विजयात कृष्णाच्या वडिलांचाही तेवढाच वाटा आहे.