Sangli Samachar

The Janshakti News

टायरवर का लिहिलं जातं L,M,N,P,Q,R,H...?



सांगली समाचार - दि. १२ एप्रिल २०२४
मुंबई - अनेकदा तुम्ही टायरवर काहीतरी लिहिलेलं पाहिलं असेल. यावर कधी कंपनीचं नाव असतं, तर कधी एखादा अंक तर कधी इंग्रजीतील अल्फाबेट लिहिलेले असतात. ज्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही आणि आपल्या गाडीसाठी टायर घेतो. पण तुम्हाला माहितीय का की ज्या इंग्रजी अल्फाबेटकडे आपण दुर्लक्ष करतो, ते आपल्या कामाचं आहे? ज्यांच्याकडे कार आहे त्यांना टायरबद्दल सामान्य लोकांपेक्षा जास्त माहिती आहे. पण असं असलं तरी देखील काही असे लोक देखील आहेत, ज्यांना याबद्दल फार कमी माहिती आहे.


आपण आपल्या टायर्सवर काही अक्षरे लिहिलेली पाहतो. पण त्या अक्षरांचा अर्थ काय हे फार कमी लोकांना माहीत आहे. खरंतर टायर्सवर L ते Y अक्षरे लिहिली जातात. ज्याचा अर्थ असतो, तो म्हणजे या टायर्सची कमाल वेग मर्यादा.

म्हणजे कोणता टायर कोणत्या वेगाने चालवता येईल. हे तुम्हाला या इंग्रजी अक्षरावरुन कळू शकेल. जर तुमच्या टायरवर L लिहिलेले असेल म्हणजे त्या टायरचा कमाल वेग ताशी 120 किमी आहे. तसेच जर M लिहिलेले असेल तर कारचा कमाल वेग 130 किमी चालवणे चांगले. तसेच जर N लिहिले असेल तर गाडीचा कमाल वेग 140 किमीपर्यंत टायर धावू शकतो आणि जर P लिहिले असेल तर गाडीचा कमाल वेग 150 किमीपर्यंत असू शकतो.

टायरवर Q लिहिले असल्यास, कमाल वेग 160 किमी आहे. R लिहिले तर 170 किमी. त्याचप्रमाणे H म्हणजे 210 किमी. तर V चा कमाल वेग 240 किमी आहे. जर तुमच्या टायरवर Y हे अक्षर लिहिले असेल तर तुमच्या टायरचा कमाल वेग ताशी 300 किमी आहे. माहिती नुसार या अक्षरांच्या वेग मर्यादेत वाहन चालवल्याने टायर फुटणार नाहीत. जे तुमच्या कारसाठी चांगलं आहे.