| सांगली समाचार वृत्त |
अयोध्या - दि.२० एप्रिल २०२४
अयोध्येतील नवनिर्माण झालेल्या राम मंदिरात २२ जानेवारीच्या दिवशी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर रामनवमीच्या निमित्ताने सूर्यतिलक सोहळा पार पडला. सूर्याची किरणं थेट रामलल्लाच्या कपाळी पडली अन् सुवर्णक्षण पहायला मिळाला. सोहळ्याचा क्षण डोळ्यांत आणि स्मृतींमध्ये साठवून घेण्यासाठी भक्तांनी राम मंदिरात गर्दी केली होती. सकाळी ११.५८ वाजता सूर्याची पहिली किरण रामललाच्या डोक्यावर पडली. दुपारी १२.२ पर्यंत म्हणजेच तब्बल ४ मिनिटं अशी स्थिती निर्माण झाली होती. हिंदू दिनदर्शिकेनुसार सूर्य अभिषेकाच्या वेळी रवियोग, गजकेसरी, केदार, अमला, पारिजात, शुभ, सरल, कहल आणि वाशी योग इत्यादी अनेक शुभ योग होते. मात्र, रामनवमीला श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्यभिषेक करण्याची प्रक्रिया नेमकी कशी होती?
आदित्य-L1 ची टीम
प्रभू श्रीरामाच्या कपाळावर विशिष्ठ पद्धतीने सूर्य टिळक लावण्यात आला. यासाठी शास्त्रज्ञांनी ऑप्टिकल मेकॅनिकल प्रणाली तयार केली होती. IIA मधील शास्त्रज्ञांच्या टीमने ही यंत्रणा बसवण्यासाठी काम केले. ही तीच शास्त्रज्ञांची टीम होती. ज्यांनी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-L1 पाठवले आहे. मूर्तीच्या कपाळाच्या मध्यभागी सूर्यप्रकाश निर्देशित करण्यासाठी चार लेन्स आणि चार आरसे लावण्यात आले होते. सध्या ही यंत्रणा तात्पुरती बसवण्यात आली आहे. मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर ही यंत्रणा कायमस्वरूपी बसविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकी प्रक्रिया कशी ?
पोलराइजेशन ऑफ लाइट या प्रक्रियेचा वापर करून सर्याभिषेक करण्यात आला होता. प्रकाशाला लेन्सचा आणि आरशाचा वापर करून एका ठिकाणी केंद्रित केलं होतं आणि ऑप्टिकल मॅकेनिकल सिस्टमचा वापर करून सूर्यतिलक सोहळा यशस्वीरित्या पार पडला. सीएसआयआर-सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे रुरकी यांनी मुख्य मंदिराची रचना, 'सूर्य टिळक' यंत्रणा डिझाइन करणं, मंदिराचा पाया आणि मुख्य मंदिराच्या संरचनात्मक आरोग्याची रचना-तपासणी केली. भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांनी देखील योगदान दिलं आहे.
दरम्यान, गिअरबॉक्स आणि रिफ्लेक्टिव्ह लेन्स अशा प्रकारे मांडण्यात आले आहेत की स्पायरजवळील तिसऱ्या मजल्यावरून येणारी सूर्यकिरणं थेट गर्भगृहात पडतील. तीन मजली मंदिराची रचना भूकंप-प्रतिरोधक आणि रिश्टर स्केलवर 8 तीव्रतेपर्यंतचे भूकंप सहन करण्यास सक्षम बनवण्यात आली आहे, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली होती.