| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.१९ एप्रिल २०२४
EVM वरुन केलेल्या मतदारांचं क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ईव्हीएमबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत निवडणूक आय़ोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. “इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या निर्मात्याला कोणते बटण कोणत्या राजकीय पक्षाला दिले जाणार आहे किंवा कोणते मशीन कोणत्या राज्यात किंवा मतदारसंघात दिले जाणार आहे हे माहित नसतं”, असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मशीन्स आणि त्यांच्या VVPAT (मतदार-व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल) युनिट्सच्या कार्याबद्दल प्रश्नांची उत्तरे देताना आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाला सांगितले की, “मतदान युनिटमध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपीएटी युनिट असते, जे मुळात प्रिंटर असते.” ईव्हीएमवरून केलेल्या मतदारांचं क्रॉस व्हेरिकेशन व्हीव्हीपीएटीच्या स्लिपवरून करण्याच्या मागणीच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
मतदानाच्या सात दिवस आधी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत VVPAT मशीनच्या 4 MB फ्लॅश मेमरीवर चिन्हांच्या प्रतिमा (पक्षचिन्हाचे फोटो) अपलोड केल्या जातात. त्यात फक्त पक्षाची चिन्हे चिकटवलेली बटणे असतात. जेव्हा एखादं बटण दाबलं जातं, तेव्हा युनिट कंट्रोल युनिटला संदेश पाठवतं, जे VVPAT युनिटला अलर्ट करतं. जे यामधून दाबलेल्या बटणाशी जुळणारे चिन्ह छापते, अशं अधिकाऱ्याने सांगितलं.
दरम्यान, याचिकाकर्ता असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचे वकील प्रशांत भूषण यांनी एका मल्याळम दैनिकातील एका अहवालाचा संदर्भ दिला की बुधवारी केरळमधील मॉक पोल दरम्यान, चार ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी युनिट्सने भाजपाच्या चिन्हाला अतिरिक्त मत नोंदवले गेले. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसंच, हा अहवाल खोटा असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
VVPAT मशिनचं कार्य कसं चालतं?
गुरुवारी, खंडपीठाने आयोगाला व्हीव्हीपीएटी मशीनचं कार्य कसं चालतं, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या सहभागाचा टप्पा आणि कोणतीही छेडछाड होणार नाही याची खात्री करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत हे स्पष्ट करण्यास सांगितले.
निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य राखा
"निवडणूक ही एक प्रक्रिया असते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य जपावं लागतं. जे अपेक्षित आहे ते केले जात नाही, अशी भीती कुणालाही वाटू नये”, असे न्यायमूर्ती दत्ता म्हणाले. प्रक्रियेचे स्पष्टीकरण देताना, आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हीव्हीपीएटी युनिटवर चिन्हे लोड केल्यानंतर, योग्य चिन्हे लोड केली गेली आहेत याची खात्री करण्यासाठी त्यास प्रिंट करण्याचा आदेश दिला जातो. रिटर्निंग ऑफिसर आणि उमेदवार हे प्रमाणित करण्यासाठी स्वाक्षरी करतात. तसंच, सुमारे १७ लाख VVPAT मशीन आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
EVM मशिन्स स्ट्राँग रुममध्ये ठेवले जातात
मतदानाच्या तारखेपूर्वीच मशीन्स स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातात आणि एकतर्फी उघडल्या जाऊ शकत नाहीत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ते पुढे म्हणाले की साधारणपणे प्रत्येक विधानसभा विभागात एक स्ट्राँग रूम असते. सर्व मशीन्स मॉक पोलद्वारे ठेवल्या जातात आणि उमेदवारांना ५ टक्के मशीन निवडण्याची परवानगी आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की मतदानाच्या दिवशी देखील मॉक पोल घेतले जातात आणि VVPAT स्लिप काढल्या जातात, मोजल्या जातात आणि जुळतात.