सांगली समाचार - दि ८ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशातील वकील व न्यायाधीशांना महत्त्वाचा कानमंत्र दिला. देशातील प्रत्येक नागरिक हा मतदार आहे. एक मतदार म्हणून प्रत्येक नागरिकाचा राजकीय विचारसरणीकडे कल असतो. तथापि, वकील व न्यायाधीशांनी राजकीय पक्ष नव्हे, तर संविधानाशीच एकनिष्ठ राहावे, असा सल्ला सरन्यायाधीशांनी दिला.
नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या शताब्दी सोहळय़ात सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते. यावेळी त्यांनी न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि निष्पक्ष भूमिकेवर भाष्य केले. आपल्या देशातील जिवंत व तर्कशुद्ध लोकशाहीमध्ये बहुतांश लोकांचा कल कुठल्या ना कुठल्या राजकीय विचारसरणीकडे असतो. अरस्तु यांनी म्हटले होते की, मनुष्य हा राजकीय प्राणी आहे. त्याला वकीलही अपवाद नाहीत. तथापि, वकिलांनी न्यायालय व संविधानाशी पूर्णपणे निष्पक्षपाती आणि एकनिष्ठ राहिले पाहिजे, असे सरन्यायाधीशांनी नमूद केले.
कायद्याच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी नैतिक ढाल
न्यायपालिकेने वेळोवेळी आपले स्वातंत्र्य व निष्पक्षपातीपणा, कार्यपालिका, विधिमंडळ व राजकीय हित यासंबंधी सडेतोड भूमिका घेतली आहे. आपण हे विसरता कामा नये की न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि बारचे स्वातंत्र्य यांचा खोलवर संबंध आहे. बारचे स्वातंत्र्य हे एका संस्थेच्या रूपात कायद्याच्या राज्याचे आणि घटनात्मक नियमांचे रक्षण करण्यासाठी नैतिक ढाल म्हणून काम करते, असे प्रतिपादन सरन्यायाधीशांनी केले.
निकालावर विचार करून प्रतिक्रिया द्याव्यात !
वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार केला पाहिजे. वकील हे काही सामान्य नागरिक नाहीत. समाजात त्यांच्या मताला विशेष महत्त्व आहे याचे भान वकिलांनी ठेवले पाहिजे, असा सल्लाही दिला.