सांगली समाचार - दि. ३ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - सीबीआयसारख्या तपास यंत्रणा गेल्या काही वर्षांत किरकोळ गोष्टीत अडकल्या आहेत, असे अधोरेखित करत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी प्राधान्यक्रम ठरवून खरोखरच देशाला धोका निर्माण करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक आरोग्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था यासारख्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. छाप्यांदरम्यान वैयक्तिक अनावश्यक जप्तीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना, चंद्रचूड म्हणाले की, ते तपासात्मक अत्यावश्यकता आणि वैयक्तिक गोपनीयतेचे अधिकार यांच्यातील संतुलन राखण्याची गरज अधोरेखित करतात.
यंत्रणांनी काय करावे ?
- आमच्यासाठी केवळ न्यायालये सुव्यवस्थित करणे नव्हे तर सीबीआय आणि तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.
- आम्ही कदाचित तपास यंत्रणांचा वापर किरकोळ गोष्टींसाठी केला. यंत्रणांनी त्यांचे लक्ष व प्रयत्न त्या गुन्ह्याच्या वर्गावर केंद्रित केले पाहिजेत, जे खरोखरच देशाची सुव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करतात," असे सरन्यायाधीश म्हणाले.