yuva MAharashtra स्व. सुशिला गुंडाप्पा कांते :धर्मपरायण मुनीसेवक आदर्श माता

स्व. सुशिला गुंडाप्पा कांते :धर्मपरायण मुनीसेवक आदर्श माता



सांगली समाचार -दि. ११ एप्रिल २०२४
(प्रा. एन. डी. बिरनाळे, सांगली.) - वयाच्या ८६ व्या वर्षी श्रीमती सुशिला कांते यांचे वार्धक्याने निधन झाले. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. परमेश्वराला सगळीकडे जाता येत नाही म्हणून त्यानं आईला पाठवलं असं ज्यू भाषेत धर्मवचन आहे. आई ही पृथ्वीपेक्षा महान आहे असं यक्षाच्या प्रश्नाला युधिष्ठरांनं उत्तर दिले.

 स्व. सुशिला आक्का अत्यंत धार्मिक होत्या. एक आदर्श पत्नी व कुटुंब वत्सल माता म्हणून नव्या पिढीसमोर त्यांनी वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि कौटुंबिक मूल्ये अनाथ झाली.  सायकलवरून श्रवणबेळगोळ यात्रा केलेले व देशी औषधांच्या माध्यमातून असंख्य रुग्णांच्या वेदना कमी केलेल्या कर्नाटकातील मांजरी गावचे श्रीमंधर पिंपळे यांच्या सुशिला अक्का या कन्या होत.

सन १९५५ मध्ये नसलापूरच्या गुंडाप्पा शांताप्पा कांते यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. स्व. गुंडाप्पा कांते यांनी अत्यंत खडतर कष्टातून वाटचाल करीत एक सचोटीचा व्यापारी म्हणून नावलौकिक प्राप्त केला. त्यांच्या या वाटचालीत एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि आदर्श माता म्हणून त्यांनी कुटुंब कबिला सांभाळला आणि नव्या पिढीसमोर आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.आप्पा व आक्कांनी कायमच आप्पांच्या भगिनी इंदू, सरस्वती, चंपा व मालती आणि आप्पांचे बंधू चामण्णा व आण्णाप्पा यांच्याबद्दल स्नेह व वात्सल्य भावना बाळगली..  स्व. गुंडाप्पा अण्णा हे प्रारंभी स्व. यशवंत गुंडे यांच्या किराणा दुकानात कामाला असताना रस्त्यावर बसून त्यांनी गुळ विकल्याचे सांगलीनं पाहिलं आहे.१४ वर्षे वनेचंद शहा यांच्या दुकानात राबून पुत्र शांतीनाथ व कन्या पद्मावती, शोभा, पुष्पा व साधना अशा सात अपत्यांचे पालनपोषण, शिक्षण करताना सुशिला अक्कांनी त्यांना धीरोदात्तपणे खंबीर साथ दिली ही बाब निश्चितच लक्षवेधी आहे. गुंडाप्पाण्णा सातवी तर सुशिला अक्का त्या काळातील चौथी पास झालेल्या.जरी अल्पशिक्षित होते तरी अपत्यांना सुसंस्कार आणि जीवन शिक्षणात उच्च स्थान देण्यात ते तसूभरही कमी पडले नाहीत.


स्व. गुंडाप्पा कांते यांचे वडील स्व. शांताप्पा व आई स्व. देवश्री हे दोघेही प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचे निसीम भक्त. प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचे ऐलकावस्थेत १९१९ मध्ये व दिगंबर मुनी अवस्थेत १९२१ मध्ये दोन चातुर्मास नसलापुरात झाले त्यावेळी कांतेच्या शेतातील गुंफेत शांतीसागर महाराजांनी ध्यानधारणा केली होती. त्यावेळी त्यांची अत्यंत मनोभावे आहारविहार सेवा कांते घराण्यांनी केली होती. गुंडाप्पाण्णा आणि सुशिला अक्का यांनी हयातभर जी मुनी सेवा केली.. जिनवाणी मातेचा गौरव केला आणि हाच वारसा पुढे समर्थपणे शांतीनाथ कांते अण्णा आणि राजश्री वहिनी यांनी पुढे चालवला त्याची पाळेमुळे शांतीसागर मुनीसेवेत आहेत. स्व. आदगोंडा पाटील, स्व. बापूसाहेब खवाटे आणि स्व. गुंडाप्पाण्णा कांते यांनी गोमटेश गौरवभूमी श्रवणबेळगोळ येथे स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य चारुकिर्ती महास्वामीजी यांच्या अधिपत्याखाली झालेले कल्पद्रुम विधान पाहिले. आणि सांगलीत अत्यंत भक्तीपूर्वक कल्पद्रुम विधान घातले.त्यावेळी स्व. गुंडाप्पा कांते आप्पा व स्व. सुशिला अक्का यांची चारुकिर्ती भक्ती सांगलीकरांनी अनुभवली. 

सांगलीत ज्या ठिकाणी हे विधान झाले त्या ग्राऊंडला आज सांगली आणि पंचक्रोशीत कल्पद्रुम क्रिडांगण अशी ओळख निर्माण झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता सत्यमार्गाने नेटका प्रपंच करुन जिनवाणी सेवेतून आनंद प्राप्त करताना आप्पा आणि अक्कांनी सांगलीत स्वरुप टाॅकीजजवळ एका खोलीत १४ वर्षे आणि पत्रावळे बस्तीसमोर आरवाडेंच्या गोडाऊन मध्ये ६ वर्षे प्रपंच केला.. आपल्या अडचणींचा पाढा वाचत न बसता सद्वर्तनी धर्माचरणाने व्यापारात आणि सार्वजनिक कार्यात कमालीचे यश प्राप्त केले ही बाब अचंबित करणारी आहे. 

कल्पद्रुम क्रिडांगणाच्या पश्चिमेला वाडीकर मंगलकार्यालयासमोर असलेल्या बंगल्यात मुनींच्या आहार चौक्यासाठी एक स्वतंत्र खोली आणि कायमस्वरूपी सोवळ्याची व्यवस्था केल्याची माहिती आम्हाला सौ. राजश्री कांते वहिनींनी दिली त्यावेळी आम्ही या जिनवाणी भक्तींने भारावून गेलो.  अत्यंत साधी राहणी, कायम जिनपूजा व मुनी व भट्टारक स्वामींच्या सेवेत व्यस्त राहून अहिंसा पालनात आनंद मानणारे आप्पा आणि अक्का यांचा दानधर्म प्रशंसनीय आहे. साधू - साध्वी यांचे आहार पडगाहन शास्त्रशुद्ध पध्दतीने करण्यात स्व. सुशिला आक्का माहिर होत्या.. तोच वारसा आज राजश्री वहिनी आणि ध. शांतीनाथ कांते आण्णा चालवतात ही बाब धर्मरक्षणात मोलाची आहे. 

आप्पा आणि आक्कांनी बद्रीनाथसह सर्व जैन तीर्थक्षेत्रांची यात्रा तर केलीच त्याचबरोबर युरोप खंडही फिरुन आले. अनंतगिरी, कनकगिरी, श्रवणबेळगोळ, हुमचा, स्तवनिधी व विजापूर येथे यात्रेकरूंसाठी त्यांनी बृहतदानातून निवासी खोल्या बांधून दिले आहेत. स्तवनिधी आणि विजापूर येथे रुम, स्वयंपाक खोली, हाॅल निर्माण कार्यात दान दिले आहे.  नसलापुरात आप्पांनी पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण देणाऱ्या गुंडाप्पा कांते प्रौढ शाळेची प्रशस्त व भव्य इमारत उभी करुन दिली आहे. स्वस्तिश्री चारुकिर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन झालेले हे शैक्षणिक कार्य पूर्ण झाले आहे. 

स्व. गुंडाप्पा कांते आप्पा यांनी सांगलीच्या न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून बरीच वर्षे धुरा सांभाळून संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. सांगलीचे नामांकित दडगे गर्ल्स हायस्कूल, वेलणकर प्राथमिक शाळा आणि हरिपूची कोंडाजी साळुंखे माध्यमिक शाळा या शिक्षण शाखांचा चौफेर विकास करण्यात कांते कुटुंबांचे योगदान लक्षवेधी आहे. आप्पांनी रत्नाकर बँक व सांगली अर्बन बँकेचे अनेक वर्षे संचालक आणि व्हा. चेअरमन म्हणून दिलेले योगदान बहुजनांना पतवान बनवण्यात मोलाचे ठरले आहे.नेमिनाथ नागरी सहकारी पतसंस्था मोठी करुन सभासद हितासाठी आप्पा खूप झटले आहेत. आप्पांनी जे योगदान शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व धार्मिक क्षेत्रात दिले त्यासाठी त्यांना आक्कांनी खंबीर साथ दिली आहे.  श्रवणबेळगोळचे स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य चारुकिर्ती महास्वामीजी यांच्यावर आप्पा आणि आक्कांची अपार भक्ती होती. त्यांच्या आहार विहारातील सेवा उल्लेखनीय व शब्दातीत आहे. पूज्य चारुकिर्ती महास्वामीजी एकदा म्हणाले, ध. गुंडाप्पाण्णा कांते यांचे चेहऱ्यावरचे हास्य म्हणजे जिनमंदीरातील घंटेचा नादस्वरच..! प. पू. भूतबली महाराज, प.पू.वर्धमानसागरजी व कांचनमती माताजी यांच्या चातुर्मास काळात कांते कुटुंबियानी जी सेवा केली आहे ती शब्दातीत आहे. 

अडचणींच्या काळात न डगमगता पतीला खंबीर साथ देऊन समाधानाने प्रपंच करत जिनवाणी भक्ती कशी करावी हे स्व. सुशिला अक्का यांच्या जीवनातून शिकण्यासारखे आहे.  कौटुंबिक मूल्ये कशी जपायची यावर स्व. आप्पा आणि अक्का कायमच सून सौ. राजश्री यांना मार्गदर्शन करत. सौ. राजश्री वहिनी सांगतात.. आप्पा आणि आक्का आम्हाला कायम चांगले मार्गदर्शन करत. सुनेनं संसार सुखी करण्यासाठी माहेरच्या गोष्टी सासरी व सासरच्या गोष्टी माहेरात सांगायच्या नाहीत. आई वडील आजारी असताना सगळी कामं बाजूला ठेवून आधी माहेरी जाऊन भेटून ये असा त्यांचा आग्रह असायचा.. तिच शिकवण माझ्या हुपरीतील आई वडिलांची होती.. सासरे आजारी असताना बाहेर न जाता त्यांची सेवा करा म्हणून मला आल्या पावली माहेराहून आई वडिलांनी परत सांगलीत पाठवलं.. माहेर आणि सासर दोन्ही समजंस.. कसं वागायचं.. कसं बोलायचं हे आप्पा आणि आक्का फार छान सांगायचे.आमचा मुलगा अभिषेक आजोबांचा आणि वडिलांचा व्यापार उद्दीम सचोटीने सांभाळतो. आमच्या कन्या पुण्याची श्वेता आणि बेळगावची पूजा हे आजी आजोबा आणि आई वडील यांच्या संस्काराने मंडीत होऊन स्थिरस्थावर झाले आहेत. ही सारी पुण्याई आप्पा आणि अक्का यांची आणि पती ध. शांतीनाथ यांचे अचूक मार्गदर्शन यांची आहे. हे आमचं भाग्य असं सांगताना राजश्री वहीनी सद्गदित झाल्या. 

आप्पांना एकत्र कुटुंब पद्धती, शेती, दारात जनावरं खूप आवडायचे. राजश्री वहिनींचे माहेर हुपरी.. मोठा वाडा..२२ व्यक्तींचं एकत्र कुटुंब...
 शेती.. चांदीचा व्यापार.. आई इंदूमती व वडील जिनगोंडा हे सुसंस्कृत व धार्मिक त्यामुळे आप्पांना आमचं स्थळ आवडलं. आम्ही पाच भगिनी.. चौघी आता बेळगावात काडापुरे, बागी व डोंगरे घराण्यात आहेत. भाऊ पद्मकांत हुपरीत आहे. पैसा अडका संपत्ती पेक्षा माणसं जोडणं.. अडल्या नडल्यांना मदत करणं.. चारुकिर्तीजी, जिनसेनजी आणि लक्ष्मीसेनजी मठांची सेवा व भक्ती करणं.. तीर्थंकर आराधना, तीर्थक्षेत्रांना मदत हा वारसा स्व. गुंडाप्पाण्णा व स्व.सुशिला आक्का यांनी दिला म्हणून आज ध. शांतीनाथ कांते अण्णा व राजश्री वहिनी धर्म व समाजसेवा करण्यात अग्रेसर आहेत. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन म्हणून ध. शांतीनाथ कांते अण्णा सेवारत आहेत.घरी कोणी बेरोजगार व्यक्ती आली तर त्याला कायमची भाकरी कशी मिळेल याचा विचार स्व. गुंडाप्पाण्णा करायचे. तीच संवेदनशीलता ध. शांतीनाथ कांते व राजश्री वहिनींच्या ठायी आहे आणि ही त्यांची संवेदनशीलताच सुशिला अक्कांना खरी श्रध्दांजली आहे. राजश्री वहिनी देखील संस्थेच्या कार्यात सहभागी असतात. हिरीरीने समाज कार्यात पुढाकार घेतात..सून नीलम याही उच्च विद्याविभूषित व सुसंस्कृत असून आक्कांच्या विचारांचा आदर करतात. हे सारं बळ आप्पा आणि आक्कांच्यामुळं त्यांना लाभलं आहे. इहलोकीची यात्रा संपवून कांते घराण्याच्या कॅप्टन आणि जिनवाणी मातेची निःस्वार्थी सेविका राहिलेल्या आक्का नव्या पिढीला बरचसं चांगलं शिकवून गेल्या एवढ मात्र निश्चित.. कांते घराण्यातून धर्म व समाजसेवेचे कार्य अखंडित चालत राहो आणि सुशिला अक्कांच्या आत्म्यास चिरशांती व सदगती लाभो.