yuva MAharashtra विशाल दादांचं चाललंय काय ?

विशाल दादांचं चाललंय काय ?



सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
मिरजेतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी एकतर्फे सांगली लोकसभा मतदारसंघावर केलेले आक्रमण, त्यानंतर झालेली एकमेकांवरील चिखलफेक, सांगली जिल्हा काँग्रेस नेत्यांची मुंबई, दिल्ली, नागपूर येथे केलेली धावाधाव. डॉ. विश्वजीत कदम यांचा लेटर बॉम्ब, हे सारे व्यर्थ जाऊन मुंबईत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या लोकसभा मतदारसंघावर महाआघाडीच्या पत्रकार बैठकीत केलेले शिक्कामोर्तब, त्यानंतर कडेपूर येथे झालेली डॉ. विश्वजीत कदम यांची पत्रकार परिषद. 

हा सारा घटनाक्रम सुरू असताना विशाल पाटील आणि त्यांच्या सेनापतींच्या मनात मात्र, एकाकी लढण्याची तयारी सुरू होती. केंद्रीय आणि राज्य पातळीवरील काँग्रेस नेत्यांनी सांगलीची जागा हिसकाऊन घेतलेल्या उद्धव ठाकरे समोर नांगी टाकली. आपल्या पराभूत भूमिकेला 'मोदी विरोधाचा' मुलामा लावत, आपण कसे बरोबर आहोत हेच सांगण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रम सिंह सावंत, पृथ्वीराज पाटील यांची गोची झाली आहे. 'टोकाची भूमिका घेऊ' असे सांगणाऱ्या डॉ. विश्वजीत कदम यांना, 'आपण मध्यम मार्ग काढू', असे सांगण्याची वेळ आली. आता हा मध्यम मार्ग म्हणजे विशाल दादांनी अपक्ष म्हणून लढायचे हाच आहे का ?. पण सहाजिकच विशाल दादांच्या पाठीशी या साऱ्या मंडळींना उघडपणे मागे राहता येणार नाही हे जग जाहीर आहे. आणि आता सर्व सामान्य मतदारांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न 'विशाल दादांचं चाललंय काय ?'

या साऱ्या मंडळींचे ठरलं आहे, सांगली लोकसभा लढाईची आणि जिंकायचीही. यासाठी विशाल पाटील आणि त्यांच्या पाठीराख्यांनी काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्याशिवाय अन्य कोणाची कशी मदत घेता येईल, याची रणनीती आखण्यात आली असून, खा. संजय काका पाटील यांचा भाजप अंतर्गत विरोधक, तसेच वंचितचे प्रकाश आंबेडकर, बहुजन आघाडीचे प्रकाश शेंडगे यांच्याशिवाय अन्य छोट्या छोट्या घटकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, प्रतीक पाटील, विशाल पाटील यांची सेना यासाठी भेटीगाठीचा सिलसिला सुरू आहे. स्वतः विशाल पाटील यांनी विविध धार्मिक नेते, संघटना, व्यापारी यांना भेटून, त्यांचा पाठिंबा मिळवत आपली बाजू करण्याचे काम जोमाने सुरू केले आहे. पण यासाठी अवघ्या पंधरा दिवसाचा कालावधी असून ही सारी मंडळी यात कितपत यशस्वी होतात यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. सर्वसामान्य मतदारांमध्ये, विशाल दादांवर झालेल्या अन्यायाबाबत 'सॉफ्ट कॉर्नर' दिसून येत आहे. तो प्रत्यक्ष मतामध्ये कसा उतरेल, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत. पण मिळणारा प्रतिसाद पाहता, सर्वत्र चर्चा आहे की विशाल दादाच येथे विजय संपादन करणार.