| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१७ एप्रिल २०२४
सांगलीच्या रक्तात बंडखोरी आहे. असे सांगत विशाल पाटील यांनी महाआघाडी विरोधात बंडाचे निशाण फडकवले. तत्पूर्वी सांगलीचे आराध्य श्री गजाननाच्या चरणी लीन होऊन, त्यानी भव्य पदयात्रा काढली. शहरातील मुख्य मार्गावरून ही पदयात्रा काँग्रेस कमिटी जवळ आल्यानंतर तिचे भव्य मेळाव्यात रूपांतर झाले. यावेळी बोलताना विशाल पाटील म्हणाले, माझे काँग्रेसवर एकतर्फे प्रेम आहे. 'वसंतदादा दोन वर्षांचे असताना अनाथ झाले. लोकांनी साथ, पाहुण्यांनी आधार दिला. तरुणपणात काँग्रेस सापडली. काँग्रेसने वसंतदादा घडवले. दादांनी काँग्रेसच्या बळावर स्वातंत्र्य लढा दिला. आज काँग्रेस विरोधात जाताना भावना होत नाही. मी २५ वर्षे पक्षाचे काम करतोय. कोणत्याही मुलाला बापासारखे, आजोबासारखे व्हावे, असे वाटू शकते. त्यात चूक काय?
२००२ मध्ये मला जिल्हा परिषद लढवायची होती. पक्षातील लोक म्हणाले, घराणेशाही होईल, थांब. मी थांबलो. २००५ मध्ये वडील वारले. लोकसभा लढवायची इच्छा होती. माझ्याऐवजी घरात (प्रतीक पाटील) उमेदवारी मिळाली. मी थांबलो. पुढे होऊन काम केले. २०१९ मध्ये मी लढले पाहिजे, असे सगळ्यांचे म्हणणे होते. पक्षाने उमेदवारी नाकारली. दुसऱ्या पक्षातून लढण्यास सांगितले. पक्षावर एकतर्फी प्रेम असल्याने तेही केले. पराभूत झालो, पण दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. काहीजण पुरात वाळू, प्लॉट शोधत होते. मी रस्त्यावर उतरलो. यंदा माझे वातावरण चांगले झाल्याने पुन्हा डाव रंगू लागला. विशालला थांबवलं पाहिजे, यासाठी बैठका झाल्या. मी वादात जायचं नाही, असं ठरवलं. मी लढत राहिलो. माझं काँग्रेसवर एकतर्फी प्रेम आहे. कितने भी तू करले सितम, हंस हंस के सहेंगे हम, अशी माझी भूमिका आहे.' यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, व " विशाल दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है |" अशा घोषणांनी आसमान दुमदुमून सोडले.
विशाल दादांचे भाषण व सनम तेरी कसम या चित्रपटातील कितने भी तू करले सितम, हंस हंस के सहेंगे हम... हे गाणं सभेचे आकर्षण ठरल.