| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२९ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतच फूट पडली आहे. विशाल पाटील व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे चंद्रहार पाटील हे दोघे महाविकास आघाडीचे उमेदवार परस्परांशी लढत आहेत. त्याचा लाभ भाजप महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना होऊन ते विजयाची हॅट्ट्रिक करतील. मात्र विशाल पाटील यांच्यावर शिवसेनेने अन्याय केला,'' असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी काल व्यक्त केले.
भाजपचे निवडणूक निरीक्षक म्हणून मंत्री कराड यांनी काल सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार मोहिमेची माहिती घेतली, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांतील राजकीय परिस्थिती, विरोधकांच्या हालचाली यांची माहिती घेतली.
मंत्री कराड म्हणाले, ''गेल्या दहा वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने केलेले भरीव काम, तसेच संजय पाटील यांनी मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने राबवलेल्या विविध योजना, सोडवलेला पाणीप्रश्न यामुळे या खेपेस निश्चितच त्यांना मोठे मताधिक्य मिळेल. स्थानिक प्रश्न महत्त्वाचे राहणारच; परंतु केंद्रात पुन्हा एकदा भक्कम, स्थिर मोदी सरकार स्थापन करायचे आहे. ''
मंत्री कराड यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात चर्चा केली. ज्येष्ठ नेते दीपक शिंदे, नीता केळकर, शहर-जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पक्षाचे नेते भालचंद्र पाटील, अरविंद तांबवेकर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील उपस्थित होते. कराड दोन दिवस सांगली मतदारसंघात थांबणार असून निवडणूक प्रचाराचा आढावा घेणार आहेत. त्या संदर्भातील अहवाल पक्षाच्या प्रदेश आणि केंद्रीय शाखेला सादर करणार आहेत.