| सांगली समाचार वृत्त |
वळसंग - दि.२९ एप्रिल २०२४
स्वार्थाने पिसाळलेली काही माणसे तोंडाला येईल ते बोलत सुटली आहेत, त्यांच्या नादी लागू नका. जत तालुक्याच्या विकासाकरिता भाजपालाच साथ द्या असे आवाहन, भाजपचे विद्यमान खासदार व लोकसभा निवडणुकीतील उमेदवार संजय काका पाटील यांनी जत तालुक्यातील वळसंग येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलताना केले.
यावेळी बोलताना संजय काका म्हणाले की, म्हैसाळ योजनेसाठी मी काय केले याचे उत्तर हवे असेल तर विरोधकांनी माझ्यासमोर यावे. म्हैसाळ योजनेसाठी आम्ही काय केले हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. राजकीय स्वार्थासाठी कोणीही काहीही टीका करीत आहेत, परंतु इतके वर्षे जत तालुक्याला दुष्काळाच्या घाईत कोणी लोटले ? कोणत्या कारखान्याला जत तालुक्यातील कष्टकरी आणि ऊसतोडीसाठी पाहिजे होती ? असा सवाल संजय काकांनी केला.
ज्यांनी स्वार्थासाठी संस्था बंद पाडल्या, हजारो लोक देशोधडीला लावली, अशी माणसं इथं येऊन माझ्यावर टीका करीत आहेत. जत चा पाण्याचा प्रश्न भाजपा 100% सोडवत आहे, राजकीय आरोप प्रत्यारोपात न अडकता जतच्या शेवटच्या गावापर्यंत पाणी कसे जाईल, याचा विचार आपण करायला हवा. म्हैसाळ योजनेसाठी 2100 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. येत्या दीड वर्षात ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. त्यामुळे पाण्यापासून वंचित असलेल्या या भागातील सर्व गावांना मुबलक पाणी पुरवठा होईल असे आश्वासन संजय काका पाटील यांनी दिले. आता कायमचा दुष्काळ हटवायचा असेल तर महायुती शिवाय पर्याय नाही असेही संजय काका पाटील यांनी सांगितले.
यावेळी सांगली जिल्हा व जत तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय काका पाटील यांना जत तालुक्यातून मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहेत.