Sangli Samachar

The Janshakti News

तुमचा पाळीव प्राणी हरवला आह ? मग स्विगी आहे ना !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२० एप्रिल २०२४
आधी केवळ फूड डिलिव्हरी अ‍ॅप असणाऱ्या स्विग्गीने आता आणखी बऱ्याच सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. यातच आता आणखी एका फीचरची भर पडली आहे. आता स्विग्गी चक्क तुमच्या हरवलेल्या पाळीव प्राण्यांना देखील शोधून देणार आहे. 'स्विग्गी पॉलीस' असं या फीचरचं नाव आहे. स्विग्गीने आपल्या अ‍ॅपमध्येच ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

स्विग्गी फूड मार्केटप्लेसचे सीईओ रोहित कपूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, की माझ्याकडे देखील पेट्स आहेत. एक पॅरेंट म्हणून मला माहिती आहे की पेट्स हरवल्यानंतर किती काळजी आणि चिंता वाटते. अशी वेळ खरंतर कोणत्याही पेट पॅरेंटवर येऊ नये. मात्र, असं झालंच तर Swiggy Pawlice हे तुमच्या मदतीसाठी तत्पर असतील.


कसं करणार काम ?

तुमच्या हरवलेल्या पाळीव प्राण्याची माहिती (फोटो, नाव, ओळख इत्यादी) तुम्ही स्विग्गीच्या अ‍ॅपमध्ये अपलोड करू शकता. यानंतर स्विग्गीच्या डिलिव्हरी पार्टनर्सना ही माहिती शेअर केली जाईल. देशभरात त्यांचे तब्बल 3.5 लाखाहून अधिक डिलिव्हरी पार्टनर्स आहेत. हे डिलिव्हरी बॉय ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी ठिकठिकाणी जात असतात. त्यामुळे त्यांची मदत यासाठी घेतली जाऊ शकते.

एखाद्या डिलिव्हरी पार्टनरला हरवलेला पाळीव प्राणी दिसला, तर ते कंपनीला याबाबत माहिती देतील. डिलिव्हरी बॉईज स्वतः ते पेट्स ताब्यात घेणार नाहीत. पेट्सना रेस्क्यू करण्यासाठी स्विग्गीने खास टीम तयार केली आहे. ही टीम लोकेशनला जाऊन ते पेट्स ताब्यात घेईल. यानंतर ही टीम पेट्सच्या मालकांना संपर्क साधेल आणि त्यांना त्यांच्या घरी सोडेल.