yuva MAharashtra सांगलीवरून ठाकरे गट-काँग्रेस भिडले; पटोलेंनी स्पष्ट शब्दात ठणकावले

सांगलीवरून ठाकरे गट-काँग्रेस भिडले; पटोलेंनी स्पष्ट शब्दात ठणकावले



सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
मुंबई - संपूर्ण राज्यात बर्चेचा विषय बनलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडविण्यासाठी मुंबईत बैठक झाली. सांगलीबाबत शिवसेनेचा (ठाकरे गट) हट्ट लक्षात घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ठाकरे गटाला चांगलेच ठणकावले आहे.
सांगली कोणत्याही स्थितीत सोडू शकत नाही, असे म्हणत ठाकरे गटाने प्रचार सुरू केला आहे. बैठकीत निर्णय झाला नाही तर काँग्रेसही प्रचार सुरू करेल, असे थेट पटोलेंनी जाहीर करून टाकले. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या शरद पवार यांनी सांगली मतदारसंघाबाबत काँग्रेसच्या श्रेष्ठींनी आग्रही भूमिका घेतल्याचा निरोप ठाकरे गटाला दिला. परंतु शिवसेनेकडून सांगलीबाबत तडजोड करण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. आमचा प्रचार सुरू आहे, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. त्यावर नाना पटोलेंनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.


महाविकास आघाडी भाजपविरोधात बनलेली आहे. सांगलीत काँग्रेसची ताकद आहे. दोन आमदार आहेत, महापालिकेत जिल्हा परिषदेत सदस्य आहेत. सांगलीत काँग्रेसचे नेटवर्क आहे, अशा शब्दांमध्ये पटोलेंनी आपली बाजू मांडली. त्याकडे मात्र संजय राऊतांनी दुर्लक्ष करत सांगली मतदारसंघ कोणत्याही स्थितीत काँग्रेसला देणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर नाना पटोले म्हणाले, सांगलीसह तीन जागांबाबत निर्णय झाल्याशिवाय महाविकास आघाडी एकत्रित पत्रकार परिषद घेता येणार नाही. तुमचा काय निर्णय होतो, हे पाहून आम्ही त्याची माहिती पक्षश्रेष्ठींना देऊ. तसेच सांगली मतदारसंघात प्रचाराला सुरुवात करू, असे स्पष्ट केले. ठाकरे व काँग्रेस नेत्यांमधील तणावातच महाविकास आघाडीची बैठक सांगलीबाबत कोणताही निर्णय झाल्याशिवाय संपली. सांगलीच्या विषयावरच गुरुवारी पुन्हा बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीत निर्णय झाला नाही तर मग मात्र महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होणार आहे. यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मैत्रीपूर्ण नाही तर लढतच होईल, असे वक्तव्य केल्याने प्रकरण अधिकच ताणले गेले आहे.

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरून वाद पराकोटीला पोहोचला आहे. आघाडीतील दोन पक्षांच्या भूमिकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. तिढा सुटल्याशिवाय एकत्रित पत्रकार परिषद नाही, ही भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.