| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२१ एप्रिल २०२४
जगातील सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश म्हणून भारताची ओळख असून ही ओळख आता बदलू लागली आहे. शस्त्र आयात करणारा नव्हे तर शस्त्र निर्यातक देश म्हणून आता देशाची ओळख होऊ लागली आहे. भारताने फिलिपाइन्सला ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र निर्यात केले असून याची पहिली खेप ही फिलिपाइन्सला शुक्रवारी पोहचवण्यात आली आहे. या मुळे चीनचा तिळपापड झाला असून शेजारी राष्ट्र फिलिपाइन्स आता चीनचे टेंशन वाढवणार आहे.
न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, ब्रह्मोस हे जगातील ध्वनिच् वेगापेक्षाही अधिक वेगाने शत्रूवर हल्ला करू शकते. हे क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने सोबत मिळून तयार केले आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्टे पाहून आणि चीनचा वाढता धोका ओळखून दक्षिणपूर्व आशियाई देश फिलीपिन्सने ब्रह्मोस खरेदी करण्याबाबत भारताशी तब्बल ३७५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा करार केला होता. हा करार झाल्यानंतर दोन वर्षांनी फिलीपिन्सला भारताने ब्रह्मोसची पहिली खेप शुक्रवारी पाठवली. एएनआयने ट्विट केलेल्या छायाचित्रांनुसार, भारतीय हवाई दलाचे एक लष्करी वाहतूक विमान फिलिपिन्स नौदलाला ब्रह्मोस क्षेपणास्त्र देण्यासाठी क्षेपणास्त्रे आणि लाँचर्ससह पाठवण्यात आले आहे. भारताने जानेवारी २०२२ मध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या तीन बॅटरीच्या पुरवठ्यासाठी फिलिपाइन्सशी करार केला होता. भारताने अत्याधुनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा पुरवठा केलेला फिलीपिन्स हा पहिला देश आहे.
पुढील आठवड्यापर्यंत फिलिपिन्स तैनात करणार ब्रह्मोस
हा करार जानेवारी २०२२ मध्ये झाला होता. या करारामुळे भारताने संरक्षण क्षेत्रातील एक प्रमुख निर्यातदार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. भारत आणि रशियाने विकसित केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ही पहिली निर्यात ऑर्डर आहे. एका अहवालानुसार, ब्राह्मोस क्षेपणास्त्रे शुक्रवारी फिलीपिन्समध्ये पोहोचणार असली तरी पुढील आठवड्यापर्यंत संपूर्ण यंत्रणा सक्रिय होऊ शकते.
भारताने २०२४-२५ पर्यंत ३५ हजार कोटी रुपयांचे संरक्षण साहित्य निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. संरक्षण मंत्रालयाने १ एप्रिल रोजी सांगितले होते की, भारताचा शस्त्रास्त्र निर्यात गेल्या आर्थिक वर्षात ३२.५ टक्क्यांनी वाढला आहे. हा आकडा पहिल्यांदाच २१ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. भारत आता आपले शस्त्रास्त्र बाबतील लष्कराला स्वावलंबी बनविण्यावर व लष्करी निर्यातीला चालना देण्यावर भर देत आहे. भारत सध्या सुमारे ८५ देशांना शस्त्रास्त्र आणि लष्करी साहित्याची निर्यात करत आहे, ज्यात सुमारे १०० स्थानिक कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये क्षेपणास्त्रे, तोफा, रॉकेट, चिलखती वाहने, सागरी गस्ती जहाजे, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे, विविध प्रकारचे रडार, पाळत ठेवणारी यंत्रणा आणि दारुगोळा यांचा समावेश आहे.
दक्षिण चीन समुद्रात तणाव
दक्षिण चीन समुद्रावर चीन आपला मालकी हक्क सांगत असून यामुळे शेजारी राष्ट्रांशी त्याचा वाद वाढला आहे. सतत होणाऱ्या या वादामुळे फिलिपाईन्स आणि चीन यांच्यात तणाव वाढत आहे अशा परिस्थितीत क्षेपणास्त्र प्रणालीची डिलिव्हरी झाल्याने चीनचे टेंशन वाढले आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीच्या तीन बॅटऱ्या फिलीपिन्सकडून किनारपट्टीवर तैनात केल्या जाण्याची शक्यता आहे.
ब्रह्मोसचे वैशिष्ट्य
ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली सुपरसॉनिक (ध्वनी वेगापेक्षा जास्त) वेगाने अचूकतेने विस्तारित श्रेणीतून जमिनीवर किंवा समुद्रातील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे. भारत-रशियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र तयार केले आहे. तसेच या क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी 'ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ही कंपनी या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र तयार करते. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, लढाऊ जहाज, लढाऊ विमाने किंवा जमिनीवरून लक्ष्यांवर डागली जाऊ शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्र २.८ मॅक वेगाने म्हणजेच आवाजाच्या तिप्पट वेगाने लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे.