| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१५ एप्रिल २०२४ -
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांची छायाचित्रे समोर आली आहेत. काळ्या आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये हल्लेखोर दिसत आहे. तर दुसरा लाल टी-शर्टमध्ये दिसत आहे. या छायाचित्रांच्या आधारे या दोघांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दोन्ही शूटर्सबाबत केंद्रीय यंत्रणांना महत्त्वाचे सुगावा मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओही समोर आका आहे. सलमानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
याप्रकरणी दोघा अनोळखी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी भा दं वि ३०७ (हत्येचा प्रयत्न करणे) आणि हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सलमान खानच्या सुरक्षारक्षकाच्या जबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांची संशयास्पद दुचाकी पोलिसांना सापडली आहे. गोळीबार करण्यासाठी बाईकचा वापर झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान, अनमोल बिष्णोई नावाच्या फेसबूक अकाउंटवरून सलमान खानच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. हा तर एक ट्रेलर असल्याचा पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. ही पहिली आणि शेवटची वॉरनिंग असून पुढच्यावेळी गोळ्या रिकाम्या घरावर चालणार नाही, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुंबई पोलीस फेसबूक अकाउंटची सत्यता पडताळत आहेत.