yuva MAharashtra महाराष्ट्रात भाजप + ठाकरे ब्रँडच अव्वल; काँग्रेस + पवार ब्रँडची पुरती घसरण!

महाराष्ट्रात भाजप + ठाकरे ब्रँडच अव्वल; काँग्रेस + पवार ब्रँडची पुरती घसरण!



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१७ एप्रिल २०२४
महाराष्ट्र मध्ये भाजप आणि ठाकरे ब्रँड हेच मोठे, त्या उलट एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले काँग्रेस आणि पवार नावाचे ब्रँड छोटे ठरले आहेत. हा केवळ 2024 च्या लोकसभा निवडणुकीतल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष नाही, तर गेल्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात स्थिरावलेल्या राजकारणातला निष्कर्ष आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि ठाकरे एकत्र येवोत किंवा विभाजित होवोत, त्यांच्या यशावर फारसा परिणाम होत नाही, हेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीतल्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्या उलट कितीही घासून प्रयत्न केले, तरी काँग्रेस आणि पवार नावाच्या ब्रँडला महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची जुनी किंमत उरलेली नाही, हे देखील याच सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. पवार नावाचा ब्रँड 3 - 4 जागांपुरता सिमित झाला असून काँग्रेस नावाचा ब्रँड तर पूर्ण संपुष्टात झाला आहे. पवार काका - पुतण्या मधल्या लढाईत पवार काकांनी बाजी मारली, असे सर्वेक्षणात दाखविण्यात आले आहे, पण पवार काकांच्या सगळ्या राजकीय खेळ्यांमधून भाजप किंवा बाकी कुठल्याच पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचा सर्वेक्षणात मागमूसही राहिलेला नाही.


टीव्ही 9 च्या ताज्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात भाजपला 25, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 3, ठाकरेंच्या शिवसेनेला 10, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 0 जागा दाखविण्यात आल्या आहेत. टीव्ही 9 चे हे सर्वेक्षण देशभरातल्या 25 लाख लोकांच्या सॅम्पल सर्वे मधून आले आहे.

या सर्वेक्षणाचा निष्कर्ष हाच की पवार काका - पुतण्यांच्या लढाईत पवार काकांनी बाजी मारली, पण ते भाजप किंवा ठाकरे किंवा शिंदे यांच्या शिवसेनेला कुठलेही डॅमेज करू शकलेले नाहीत. राष्ट्रवादीचा जुना परफॉर्मन्स देखील त्यांना टिकवता आलेला नाही. त्या उलट महाराष्ट्राचे राजकारण काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या कब्जातून बाहेर पडून ते पूर्णपणे हिंदुत्वनिष्ठ पक्ष्यांकडे झुकले आहे हाच कल यातून ठळकपणे समोर आला आहे. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी भाजप सत्ताधारी, त्याच्या जोडीला एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि विरोधी पक्षात ठाकरेंचीच शिवसेना प्रबळ, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दुय्यम आणि तिय्यम स्थानी हा या सर्वेक्षणाचा खरा निष्कर्ष आहे.