yuva MAharashtra मोदींना जेवढ्या शिव्या, तेवढा मोठ्या विजयाचा दावा; मोदींचाच मीडियाला फॉर्म्युला !

मोदींना जेवढ्या शिव्या, तेवढा मोठ्या विजयाचा दावा; मोदींचाच मीडियाला फॉर्म्युला !



सांगली समाचार - दि. ११ एप्रिल २०२४
रामटेक - महाराष्ट्रातल्या रामटेकच्या आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि "इंडिया" आघाडीवर शरसंधान साधलेच, पण त्या पलीकडे जाऊन मीडियाला एक नवा फॉर्म्युला देताना काँग्रेस आणि "इंडिया" आघाडीतल्या नेत्यांना जबरदस्ती चिमटे देखील काढले.

भाषणाच्या ओघात मोदी म्हणाले, की देशात सगळीकडून आता सर्वे येत आहेत. त्यामध्ये भाजप सरकारच्या बंपर विजयाच्या घोषणा होत आहेत, पण मी मीडियावाल्यांना विचारतो, तुम्ही सर्वेसाठी एवढा खर्च आणि मेहनत का करता ?, त्यापेक्षा मी तुम्हाला एक नवा फॉर्मुला देतो, मोदीला विरोधक जेवढ्या शिव्या देतील तेवढा मोदीचा विजय मोठा असेल हे तुम्ही गृहीत धरून चाला. कारण माझा प्रत्येक निवडणुकीतला अनुभव हाच आहे. विरोधकांनी जेवढ्या मला शिव्या मोजल्या, एवढा माझा विजय मोठा झाला!!

हे काँग्रेसवाले मोदी सरकार पुन्हा आल्यावर संविधान बदलण्याची भीती दाखवतात. तसा अपप्रचार करतात, पण याच काँग्रेसवाल्यांनी "एक देश, एक कायदा" देशात कधी लागू होऊ दिला नाही आणि ते संविधान वाचवण्याच्या आज बाता मारत आहेत, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी हाणला.


प्रशांत किशोर यांच्यासारखे निवडणूक रणनीतीकार काँग्रेस नेत्यांच्या आणि विरोधकांच्या कानी कपाळी ओरडत आहेत, की तुम्ही मोदींवर व्यक्तिगत टीका करू नका. ती टीका बॅकफायर होते, पण काँग्रेसवाले आणि विरोधक त्यांचे बिलकुल ऐकत नाहीत. ते मोदींवर व्यक्तिगत टीका करतच राहतात. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालांवर होतो. आज स्वतः मोदींनी रामटेकच्या सभेत वेगळ्या भाषेत प्रशांत किशोर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचाच पुनरुच्चार केला.