Sangli Samachar

The Janshakti News

अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२९ एप्रिल २०२४
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाचा व्हिडीओ अज्ञात व्यक्तीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल होताच भाजपवर जोरदार टीका होऊ लागली. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालय आणि भाजप नेत्यांकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ नेमका कुणी एडिट केला. तो सोशल मीडियावर कोणकोणत्या व्यक्तींनी व्हायरल केला, याची माहिती दिल्ली पोलिसांकडून मागवण्यात आली आहे. देशभरात अशी एक्स-हँडल चालवणारे स्पेशल सेलच्या रडारवर आहेत. या प्रकरणी लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

पोस्ट केलेला व्हिडीओ डिलीट करणाऱ्या व्यक्तींचा देखील शोध घेतला जातोय. दुसरीकडे भाजपने या एडिट केलेल्या व्हिडिओबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून देशभरात एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हिडीओमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.


देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राजकीय नेते प्रचारसभा घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच अमित शहा यांच्या भाषणाचा व्हिडीओ एडिट करून अज्ञाताने सोशल मीडियावर व्हायरल केला. "आमची सत्ता आल्यानंतर SC, ST आणि OBC यांचं आरक्षण आणलं जाईल", असं अमित शहा व्हिडीओ म्हणताना दिसून येत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे अमित शहा असे काही बोललेच नाही. हा व्हिडीओ बनावट असून भाजपविरोधात द्वेष पसरवण्याचं काम केलं जातंय, असा आरोप भाजप नेत्यांनी केलाय. केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील व्हिडीओची दखल घेत पोलिसांत एफआयआर नोंदवला आहे.