सांगली समाचार - दि ५ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - कॉंग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची एकही संधी सोडत नाही. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांचे एकमेकांवर शाब्दीक वार सुरु झाले आहेत. आता राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तीसंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार राहुल गांधी यांच्याकडे 9 कोटी 24 लाख 59 हजार 264 रुपये चल संपत्ती आहे. तसेच अचल संपत्ती जवळपास 11 कोटी 14 लाख 02 हजार 598 रुपये आहे. राहुल गांधी यांच्याकडे एकूण संपत्ती 20 कोटी 38 लाख 61 हजार 862 रुपये आहे. राहुल गांधी यांच्यावर 49.79 लाख रुपये कर्ज आहे. या प्रतिज्ञापत्र दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने सुरु केलेल्या योजनेच्या प्रेमात राहुल गांधी पडल्याचे दिसत आहे. मोदी सरकारच्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेत राहुल गांधी यांनी मोठी गुंतवणूक केली आहे.
राहुल गांधी यांची अशी आहे गुंतवणूक
राहुल गांधी यांच्या PPF खात्यात 61.52 लाख रुपये आहेत. तसेच राहुल गांधी यांनी म्युचुअल फंड आणि शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. राहुल गांधी यांच्याकडे ITC, ICICI बँक, अल्काइल एमाइन्स, एशियन पेंट्स, बजाज फाइनेंस, दीपक नाइट्राइट, डिवीज लॅबोरेटरीज, इन्फोसिस, टाटा कंसल्टेंसी सव्हिसेज (TCS), ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि टायटन कंपनीचे शेअर आहेत. शेअरमध्ये 4.30 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना सुरु केली. भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (RBI) हे सोने विकले जाते. 8 वर्षांसाठी गुंतवणुकीची ही योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करताना पेपर सोने खरेदीसोबत वर्षाला 2.50% व्याज मिळते. तसेच मुदतीनंतर सोन्याचे त्यावेळी असणाऱ्या दरानुसार रक्कम परत मिळते. ही योजना राहुल गांधी यांना चांगली आवडली आहे. राहुल गांधी यांनी या योजनेत 15.27 लाख रुपये गुंतवणूक केली आहे. यामुळे राहुल गांधी गुंतवणुकीबाबत चांगलेच सजग दिसत आहेत.