सांगली समाचार दि. ९ एप्रिल २०२४
सांगली - महाविकास आघाडीचं लोकसभा निवडणुकीचं जागावाटप आज जाहीर झालं. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जागावाटप जाहीर केलं. मात्र, सांगली लोकसभेच्या जागेवरुन वादंग निर्माण झाले आहे. सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत. जसा वसंतदादाच्या पाठीत खंजिर खुपसला होता, तसाच खंजीर विशाल पाटील यांच्या पाठीत खुपसला गेल्याच्या भावना काँग्रेस कार्यकर्ते बोलत आहेत. ज्यांनी कुणी हे केलंय हे त्यांना परवडणारे नाही असे कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांचा नेमका रोख कोणाकडं? असा सवाल उपस्थित केला जातोय.
वसंतदादा प्रेमी हाच आमचा गट
सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटली आहे. तिथून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक होते. मात्र, जागा ठाकरे गटाला सुटल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची निवडणूक लढवायचीच अशी भूमिका कार्यकर्ते घेताना दिसतायेत. जसा वसंतदादाच्या पाठीत खंजिर खुपसला होता, तसाच खंजीर विशाल पाटील यांच्या पाठीत खुपसला गेल्याच्या भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. ज्यांनी कुणी हे केलंय हे त्यांना परवडणारे नाही. आता वसंतदादा प्रेमी हाच आमचा गट असेल असे कार्यकर्त्यांनी म्हटलंय. विशाल पाटील जी भुमिका घेतील त्या भूमिका आम्ही पार पाडू असंही कार्यकर्त्यांनी सांगितलं.
आता लक्ष उद्या जिल्ह्यातील नेत्यांच्या पत्रकार परिषदेकडे
दरम्यान, पुढचा निर्णय काय होणार? याबाबत सांगली काँग्रेसचे नेते उद्या (10 एप्रिल) एकत्र पत्रकार परिषद घेतील. मात्र, अंतीम निर्णय विशाल पाटील हे घेतील. उद्या 11 वाजता बैठक पार पडणार असल्याची माहिती काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. मात्र, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहयला मिळत आहे. आमचं चुकलं काय? आता लढायचं अशा स्वरुपाचे विशाल पाटील यांचे पोस्टर व्हायरल होत आहेत. त्यामुळं विशाल पाटील लढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळं आता सांगली लोकसभेची निवडणूक विशाल पाटील अपक्ष लढणार का ? अशी देखील शक्यता वर्तवली जातेय. मात्र, उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदतेच अथिम निर्णय काय होणार हे समजणार आहे.