| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२१ एप्रिल २०२४
ठाकरे शिवसेना गटाचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याने अनेकदा मित्र पक्षांच्या नेत्यांमध्ये मिठाचा खडा पडला आहे. एकदा अनेक प्रकरणे त्यांच्यावर शेकली आहेत. पण राऊत आपली वक्तृत्व शैली सोडायला किंवा बदलायला तयार नसतात. किंबहुना हीच त्यांची खासियत आहे. म्हणूनच राऊत नेहमी माध्यमांचे टीआरपी राहिलेले आहेत. परंतु आता सांगलीत त्यांची भाषा नरमाईची झाली असल्याचे आश्चर्यकारक चित्र पहावयास मिळत आहे.
सांगली लोकसभा मतदार संघात पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय राऊत आढावा घेण्यासाठी सांगलीत आले आणि त्यांनी विश्वजीत कदम व विशाल पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. यामुळे त्यांना काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागले. परंतु आपल्या स्वभावाप्रमाणे ते ताठर भूमिकेतच दिसले. आणि म्हणूनच आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली. तरीही बंडखोरीच्या तयारीत असलेल्या विशाल पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले.
परंतु पै. चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गेल्या दोन-चार दिवसात संजय राऊत यांची भूमिका व भाषा नरमाईची झाली आहे. सध्या त्यांनी विशाल पाटील यांना वसंतदादांच्या व बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाची आठवण करून देत, विशाल पाटील यांच्यामध्ये वसंतदादांचा डीएनए असून ते ठाकरेंच्या विरोधात जाणार नाहीत, असे म्हटले आहे. आता राऊत यांची ही बदललेली भाषा विशाल पाटील यांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे आहे, की कुणीतरी त्यांच्या कान पिचक्या घेतल्यामुळे आहे हे तेच जाणोत.
सध्या विशाल पाटील यांची बंडखोरी मागे घेण्यासाठी काँग्रेस मधून जोरदार प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नांना खो बसू नये, म्हणून संजय राऊत यांना सबुरीचा सल्ला दिला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र विशाल पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असून, ती कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे दिसून येत आहे.
जर २२ एप्रिल रोजी विशाल पाटील यांनी आपली बंडखोरी मागे घेतली नाही, तर संजय राऊत आपल्या मूळ स्वभावानुसार विशाल पाटील यांच्यावर तोफा डागतात ही अन्य काय भूमिका घेतात, याचे उत्तर २२ एप्रिल नंतरच मिळेल.