सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
कडेगाव - डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने सातत्याने उसाला उच्चांकी दर दिला. यापुढेही उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा कायम राखली जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली. सोनहिरा कारखान्याच्या २०२३-२४ च्या २४ व्या गळीत हंगामाची सांगता व साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी कदम बोलत होते. कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम, उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, कार्यकारी संचालक शरद कदम आदी उपस्थित होते.
साखर उताऱ्याकडे लक्ष द्या...
ते म्हणाले, 'संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव, पलूस व खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला देण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सोनहिरा कारखान्याची स्थापना केली. पारदर्शक कारभार व उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम राखत 'सोनहिरा'ने देशातील एक सर्वोत्कृष्ट कारखाना असा लौकिक मिळवला आहे. सभासद, शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडला. 'सोनहिरा'च्या २०२३-२४ या २४ व्या गळीत हंगामात १४८ दिवस १० लाख ५९ हजार ७८० टन उसाचे गाळप झाले. ११ लाख ८२ हजार ३०९ साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले.'
कार्यकारी संचालक शरद कदम यांनी हंगामाचा आढावा घेतला. ऊसतोडणी, वाहतूक कंत्राटदार, बैलगाडी कंत्राटदार, हार्वेस्टिंग मशीन मालकांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. संचालक पंढरीनाथ घाडगे, बापूसाहेब पाटील, युवराज कदम यांच्यासह सभासद, खातेप्रमुख व कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. शेती अधिकारी प्रशांत कणसे यांनी आभार मानले.