| सांगली समाचार वृत्त |
जत - दि.१५ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने पै. चंद्रहार पाटील यांच्या रूपाने उमेदवार देऊन आव्हान उभे करण्याचे प्रयत्न केले. परंतु आता हाच त्यांचा प्रयत्न त्यांच्या गळ्याशी आला आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार न घेता संधी दिली तर काँग्रेसतर्फे, अन्यथा अपक्ष म्हणून निवडणुकीत दंड थोपटून उतरलेल्या विशाल दादा पाटील यांना मतदार संघातून वाढता पाठिंबा मिळत आहे.
जतचे माजी आमदार विलासराव जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख या जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. विलासराव जगताप यांनी तर पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट विशाल दादांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तर पृथ्वीराज देशमुख आपली छुपी ताकद विशाल दादांच्या मागे उभी करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
या दोन मोठ्या नेत्यांबरोबरच वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनीही विशाल दादा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची भूमिका गुलदस्तात असली तरी, शेवटच्या क्षणी ते विशाल दादांच्या पाठीमागे उभे राहतील. असा विश्वास विशालदादा गटाला आहे. त्याचप्रमाणे सांगलीतील अनेक छोटे मोठे नेते विशाल पाटलांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यामुळे महाआघाडीच्या पै. चंद्रहार पाटील यांना पराभवास सामोरे जावे लागणार का ? अशी मतदार संघात रंगली आहे.
ज्या पद्धतीने सांगलीत शिवसेनेने अरेरावी करण्याचा प्रयत्न चालविला आहे, ते पाहता सांगलीची स्वाभिमानी जनता यावेळी विशाल दादांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील, असे मतदारसंघाचा आढावा घेतलेल्या, अनेक पत्रकारांनी जाहीरपणे सांगितलेले आहे.
आणि म्हणूनच नागपूर गाठलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी या ताज्या घडामोडी काँग्रेस श्रेष्ठींसमोर मांडून, अजूनही उद्धव ठाकरे यांची समजूत घालून, सांगलीत काँग्रेसचा उमेदवार म्हणून विशाल पाटील यांच्या पाठीशी उभे राहावे असा प्रयत्न करणार आहेत. जर याला यश आले, तर उद्या विशाल पाटील काँग्रेसतर्फे अर्ज दाखल करतील अन्यथा अपक्ष म्हणून ते महाआघाडी व भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करतील हे नक्की.