सांगली समाचार- दि. ३ एप्रिल २०२४
वर्धा - "मी शरद पवारांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही, ती शरद पवारांनी करुन दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. जिल्हा परिषद, आमदारकी, नगरपालिका, नगरपरिषद जिंकलो. पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही. शरद पवारांचे मनापासून आभार, त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब करुन दाखवला. शरद पवारांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं. ज्या महात्मा गांधींचं नाव वारंवार सांगून काँग्रेसने इतकं वर्ष राजकारण केलं, त्याच गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी करुन दाखवलं. यासाठी मला त्यांचे आभार मानायचे आहेत," असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
भाजपाने वर्ध्यात रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. तसंच सध्या मोदींची लाट नसून, त्सुनामी आहे असं सांगत रामदास तडस यांना 60 टक्के मतं मिळतील असा विश्वास व्यक्त केला. "काँग्रेसला उमेदवार सापडेना, कोणी उभं राहायला तयार नव्हतं. मग एक उमेदवार त्यांनी काँग्रेसमधून आयात केला. त्यांनीही विधानसभेत टिकावं लागणार नाही, यासाठी किमान लोकसभेत शहीद होऊन मोठं व्हावं यासाठी राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं. गांधींजींचं वर्धा हे ना काँग्रेसचं, ना शरद पवारांचं. ते मोदी आणि भाजपाचं आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे," असंही ते म्हणाले.