सांगली समाचार - दि ५ एप्रिल २०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत चांगलाच वाद रंगला आहे. ठाकरे गटाने विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केल्याचा आरोप करत काँग्रेसने सांगलीवरील दावा कायम ठेवला आहे. दरम्यान, भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटलांनी काँग्रेस नेते इच्छुक विशाल पाटलांना 'मैदानात या, पळ काढू नका' असा इशारा दिला. त्यामुळे काँग्रेसची इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाल्याचे दिसते.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सांगलीमध्ये जोरदार राजकारण रंगले होते. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असे चित्र निर्माण झाले. भाजपने जाहीर केलेल्या दुसर्या यादीतच खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार कामाला लागले आहेत. त्यांना पक्षांतर्गत विरोध असला तरी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांपर्यंत पोहोचून संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे भाजप प्रचाराला लागली असताना विरोधी पक्षांमध्ये उमेदवारीबाबतचा पेच सुटलेला नाही. निवडणुकीपूर्वी खासदार संजयकाका पाटलांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांनी मैदानात यावे, पळ काढू नये, असे ललकारले होते. त्यानंतर विशाल यांनीही खासदारांना प्रत्यत्तर देत कामाला सुरुवात केली. लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बैठकांचा धडाका लावला. विशाल हे मतदारांपर्यंत पोहोचले असल्याने काँग्रेसकडून त्यांनाच उमेदवारी मिळणार हे स्पष्ट झाले होते. या परिस्थितीत ठाकरे गटाने सांगलीवर डाव टाकल्याने विशाल यांची कोंडी झाली आहे.
मिरजेत प्रचार करताना संजयकाकांनी पुन्हा काँग्रेस नेते विशाल पाटील यांना डिवचले आहे. निवडणुकीचा आखाडा सुरू झाला आहे. मी तयार आहे, विरोधकांचा मेळ लागता लागेना. मी मैदानातून पळ काढणार नाही, म्हणणार्यांना तिकिटासाठी पायपीठ सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच पळ काढला असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र, मैदानात या पळ काढू नका, असे सांगत विशाल पाटलांना पुन्हा आव्हान दिले आहे. भाजपकडून आव्हान देत असताना महाविकास आघाडीतील तिढा सुटला नसल्याने जिल्ह्यातील काँग्रेसची कोंडी झाली आहे. त्यामुळे विशाल पाटील हे संजयकाकांना कसे उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.