| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२६ एप्रिल २०२४
पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणांची स्वतःहून दखल घेत निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावर नोटीस जारी केली आहे. निवडणूक आयोगाने 2९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत दोन्ही पक्षांकडून उत्तरे मागवली आहेत.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या आणि त्यांच्यावर लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि धर्म, जात, पंथ आणि भाषेच्या नावाखाली फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता.
भाजप-काँग्रेस अध्यक्षांना नोटीस बजावली
या प्रकरणी निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ मधील अधिकारांचा वापर करून पक्षाध्यक्षांना स्टार प्रचारकांच्या वर्तनासाठी जबाबदार धरले असून, दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीला २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राजकीय पक्षांना त्यांचे उमेदवार आणि स्टार प्रचारक यांच्या वर्तनाची जबाबदारी घ्यावी लागेल. अशी भाषणे, विशेषत: निवडणूक प्रचारादरम्यान उच्च पदांवर असलेल्या लोकांची, अधिक चिंताजनक आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
मोदींचे राजस्थानमधील भाषण वादात
मोदींनी नुकतेच राजस्थानमधील एका सभेत सांगितले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या मालमत्तेचे वाटप घुसखोर आणि जास्त मुले असलेल्यांमध्ये करेल.
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ दिला, ज्यात मनमोहन सिंग म्हणाले होते की देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याक समुदायाचा पहिला हक्क आहे.
या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला आवाहन केले होते की, पीएम मोदींचे वक्तव्य फुटीर आणि द्वेषपूर्ण असून ते आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. काँग्रेसने १४० पानांत पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे 17 तक्रारी केल्या आहेत.
राहुल गांधींचा दावा खोटा : भाजपा
भाजपने २२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. भाजपने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, राहुल गांधी देशातील गरिबी हटवण्याचे खोटे आश्वासन देत आहेत.
राहुल गांधी यांनी भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर देशात फूट पाडण्याचा आणि निवडणुकीचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे.