Sangli Samachar

The Janshakti News

पक्षातील बड्या नेत्यांची साथ नसली तरी..," विशाल पाटलांनी मतदारांना घातली भावनिक साद !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - २३ एप्रिल २०२४
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समजूत काढल्यानंतरही सांगलीत कॉंग्रेस अंतर्गत बंडखोरी झाली. कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. त्यामुळे सांगलीत ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील तसेच महायुतीचे संजय काका पाटील तर अपक्ष म्हणून विशाल पाटील अशी लढत निश्चित झाली आहे. यातच विशाल पाटील यांना आता निवडणुक आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे या लढतीकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा निवडणुक लढविण्यावर ठाम भूमिका घेतली आहे. लोकसभेसाठी त्यांना लिफाफा चिन्ह मिळाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सांगली जिल्ह्याच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. या लढ्याचा महत्वाचा टप्पा आता सुरू झालाय. या लढ्यात अगदी पहिल्या दिवसापासून तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. त्यामुळे मला लढण्याची ताकद मिळाली असून या निवडणुकीत लिफाफा या चिन्हावर निवडणुक लढवत असल्याची प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिलीय.


पुढे बोलतांना विशाल पाटील म्हणाले की, देशाचं भविष्य ठरविण्याच्या या लोकसभा निवडणुकीत मला पक्ष किंवा पक्षातील बड्या नेत्यांची साथ नसली तरी तुम्हा सर्वांची साथ आहे. त्यामुळे हीच काय अशा अनेक लढाया लढून जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. हा आत्मविश्वास केवळ तुम्हा सर्वांमुळे निर्माण झाला हेही तेवढच खरं. सांगली जिल्ह्यातील शेवटच्या घटकासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा स्वर्गीय वसंतदादांचा वारसा चालविण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आलेली आहे. पुढील काही दिवसांत मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेच. त्याआधी आपल्याला मिळालेलं लिफाफा हे चिन्ह सांगावं, लक्षात ठेवा माझा विजय म्हणजे काँग्रेसचाच विजय आहे. असेही विशाल पाटील यांनी म्हटलंय.