| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२८ एप्रिल २०२४
" गड आला पण सिंह गेला" हे वाक्य आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. छत्रपतीं शिवाजी महाराजांचे सिंह तानाजी मालुसरे यांच्या बाबतीतील हे वाक्य एक नवा इतिहास घडवून गेले. पण सध्या सांगली जिल्ह्यात एक नवा इतिहास आणि एक नवे घोषवाक्य तयार होत आहे. आणि ते म्हणजे...
"गड गेला पण एका नव्या सिंहाचा जन्म झाला !"
स्व. वसंतदादा पाटील यांच्यानंतर डॉ. पतंगराव कदम यांच्या रूपाने सांगली जिल्ह्याला एक खमके नेतृत्व मिळाले होते. अनेक संकटांना तोंड देत वादळातील हा दिवा अखंडित पेटता राहिला. भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून केवळ सांगली जिल्ह्यातीलमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार देऊन आणि अनेक कुटुंबांना आधार दिला होता. परंतु त्यांच्या अकस्मिक निधनाने पुन्हा एकदा सांगली जिल्हा काँग्रेस निराधार झाली.
डॉ. पतंगराव कदम यांच्याप्रमाणेच मदन पाटील यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत आपले नेतृत्व सिद्ध केले होते. त्यांच्या मार्गात अनेकांनी हरेक प्रकारे अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु मदनभाऊ या सर्वांनाच पुरून उरले. दुर्दैवाने त्यांचेही दुःखद निधन झाले. परिणामी सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पुन्हा एकदा उघडी पडली.
या दोन्ही नेत्यांच्या पश्चात अनेक तरुण नेत्यांनी काँग्रेस पक्षाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण एकमेकाला शह देण्याच्या प्रयत्नात ना हे नेते मोठे झाले, ना या जिल्ह्यातील काँग्रेस. परंतु गेल्या दोन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. साऱ्यांनाच वस्तुस्थितीची जाणीव झाली. कोणाची ताकद किती आहे, याचा अंदाज आला आणि सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. विश्वजीत कदम यांच्या रूपाने जिल्ह्याला व जिल्हा काँग्रेसला पुन्हा एकदा सुवर्णाचे दिवस येऊ पाहत आहेत.
सांगली येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांच्या आक्रमक भाषणाने सर्वांचीच मने जिंकली. काँग्रेस व काँग्रेसचे कार्यकर्ते रिचार्ज झाले. विशाल पाटील यांच्यासाठी त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी झुंज दिली, ती संपूर्ण जिल्ह्याने पाहिली. अर्थात ठाकरे यांच्या हट्टापुढे आणि काँग्रेसच्या हतबलतेमुळे ते सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांची उमेदवारी राखू शकले नाहीत.
असे असले तरी विशाल पाटील यांनी त्यांच्या बाबतीत मनात कटूता न राखता आपला प्रचार सुरू ठेवला आहे. डॉ. विश्वजीत कदम यांनीही एक प्रकारे विशाल पाटील यांना सूट दिल्याचे खाजगीत बोलले जाते. विशाल पाटील यांच्या बाबतीत जे महाभारत घडले, त्यामुळे केवळ काँग्रेसमध्येच नव्हे, तर दादा प्रेमींमध्ये व काँग्रेस प्रेमी मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटला. याचा फायदा विशाल पाटील यांना होतो आहे. विशाल पाटील यांनी एका प्रचार दौऱ्यात "मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता असून निवडणुकीनंतर डॉ. विश्वजीत कदम यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितल्याने", डॉ. विश्वजीत कदम यांचे नेतृत्व अबाधित राहिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कोणाच्या गमजा चालू देणार नाही, असे ठणकावून सांगितलेल्या डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली मतदार सांगली जिल्ह्यात काँग्रेसचा हात हातात घेणार का ? आणि जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस कात टाकून उभी राहणार का ? याचे उत्तर भविष्यातील तरुण नेतृत्वाच्या 'हातात हात' की 'पायात पाय' या धोरणावर अवलंबून राहणार आहे. तूर्तास तरी डॉ. विश्वजीत कदम जिंदाबाद चा नारा बुलंद होत आहे.