| सांगली समाचार वृत्त |
जत - दि.१५ एप्रिल २०२४
सांगली लोकसभेसाठी सुरुवातीपासून संजय काकांना विरोध करणारे विलासराव जगताप यांनी आज थेट पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे खा. संजयकाका आणि जिल्ह्यातील भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. जगताप यांच्यासह तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्राम भैय्या जगताप, जत शहराध्यक्ष आण्णा भिसे, राजू डफळे, लक्ष्मण बोराडे, राजू चौगुले आदींनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत.
दरम्यान, विलासराव जगताप यांनी निर्णय जाहिर केल्यानंतर दुष्काळी फोरम दोन दिवसात विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसेल असा ठाम दावा देखील केला असून, विशाल पाटील मोठया मताधिक्याने विजयी होतील असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी खा. संजय काका पाटील यांची राजकारणातील गद्दारी जाहीरपणे समर्थक कार्यकर्त्यांसमोर मांडली. जगताप यांच्या निर्णया नंतर मात्र सांगली लोकसभेसाठी आता चांगलीच चुरस वाढली आहे.
खासदार संजय काका व विलासराव जगताप यांच्यातील मतभेद गेल्या काही वर्षापासून टोकावर गेले होते. खासदार संजय काका यांनीच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जगताप यांना अंतर्गत धक्का दिल्याचा आरोप जगताप गटाने त्यांच्यावर केला होता. त्यामुळे या दोघांमध्ये मतैक्य होण्याऐवजी ही दरी वाढतच गेली. त्याचे पडसाद आता लोकसभेच्या या निवडणुकीत दिसून येत आहेत.