सांगली समाचार - दि. ११ एप्रिल २०२४
पलूस - सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार व अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे. जिल्ह्यात पक्षाचा पाया भक्कम असून उमेदवारी डावलल्याने कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. देशातून सत्ताधारी भाजपा सरकारला हद्दपार करायचे आहे. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळावी. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागा मिळण्यासाठी फेरविचार करावा, अशी आग्रही मागणी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पलूस येथे काल (दि.१०) पत्रकार परिषदेत केली. यावेळी कदम यांनी महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिला आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटप निश्चित झाल्यानंतर सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आमदार डॉ. विश्वजीत कदम, विशाल पाटील कोणती भूमिका घेतात. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या पार्श्वभूमीवर पलूस भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विश्वजीत कदम कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.
कदम पुढे म्हणाले की, गेल्या महिन्यापासून संपूर्ण देशात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेला सामोरे जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. देशात जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवणे, कायदा- सुव्यवस्था व बेरोजगारी यांची वाचा फोडण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहोत. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या तसेच सर्व लोकांच्या भावना महाराष्ट्रातील नेत्यांच्या पर्यंत दिल्लीतील नेत्यांच्या पर्यंत पोचवल्या. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आम्ही सातत्याने काँग्रेसलाच जागा मिळाली पाहिजे, या भूमिकेत होतो. स्वातंत्र्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यामुळेच ही जागा काँग्रेसला मिळण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आग्रही होतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सर्व ज्येष्ठ नेते यांच्याशी सातत्याने भेटून याबाबत आग्रही मागणी केली. जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे दोन आमदार आहेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) सुमनताई पाटील, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसने मजबूत बांधणी केलेली आहे.
कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिल्यामुळे सांगलीच्या जागेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे खूप आग्रही होते. त्यांनी २१ तारखेला चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी खूप आदर आहे. एखादी बातमी पचनी पडायला वेळ लागतो. येणाऱ्या काही दिवसांत काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारातून घेऊन मंथन करणार आहोत. देशात व राज्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत. उध्दव ठाकरे यांनी सर्वांना विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. सांगली जिल्ह्याची वस्तुस्थिती जाणून घेऊन या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी कदम यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, युवक नेते जितेश कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील उपस्थित होते.