| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१७ एप्रिल २०२४
लोकसभा तोंडावर येऊन ठेपली तरी महाविकास आघाडीमधला सांगलीच्या जागेचा वाद संपला नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रसेचे नेते विशाल पाटील यांनी सांगलीत भव्य शक्तीप्रदर्शन केलं आहे. अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांनी सभेतून भूमिका मांडली. काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराणे संपवावी यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत, यामागे कोण आहे? का आहेत? याचा समाचार निवडणुकीनंतर घेणार, असा इशारा लोकसभेचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी दिला आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी आपल्याकडे येऊन मशाल घेऊन लढा, असा संदेश पाठवला होता. पण पक्षाकडून जरी सांगितले असते तर आपण काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहोत, असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त केले आहे.
माझ्या उमेदवारीला विरोध म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची, अशी भूमिका असेल तर मी थांबायला तयार आहे, अशी भूमिका आपण स्पष्ट केली होती. राजकारणात लहानपणापासूनच यायची आपली इच्छा होती. पण राजकारणात पदासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही, ही देखील आपली भूमिका असल्याचे विशाला पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत, हे कोणाला बघवलं नाही, असेही विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास आज देखील आहे, असेही विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आज तिसरा अर्ज दाखल केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.