| सांगली समाचार वृत्त |
जत - दि.२८ एप्रिल २०२४
काँग्रेस मधून बंडखोरी करीत अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या विशाल दादा पाटील यांनी, तिरंगी लढतीत सर्वात शेवटी प्रचार सुरू केला असतानाही जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आपल्या प्रचार सभा मधून विशाल पाटील यांनी रांगड्या भाषेत मतदारांशी संवाद साधत, आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे.
जत भागात अनेक गावातून विशाल पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री घोरपडे सरकार यांच्या समवेत अनेक गावातून धडाकेबाज प्रचार सभा घेतल्या. यावेळी बोलताना विशाल पाटील यांनी आपल्याला उमेदवारी मिळवण्यात मुंबई दिल्ली नागपूर या दौऱ्यात दीड महिना घालवला. परंतु आमचा पक्ष चुकला. मित्र पक्षाने सांगलीच्या जागेवर आक्रमण केल्यानंतर तितक्याच आक्रमकपणे पक्षाच्या नेत्यांनी आघाडी तुटली तरी चालेल परंतु सांगली सोडणार नाही, अशी भूमिका घ्यायला हवी होती. मी थांबायचे ठरवले होते. आपल्या नशिबात जर निवडणूक नसेल तर लढून काय फायदा ? म्हणून मी बाजूला झालो होतो.
परंतु जिल्ह्यातून मला अनेक फोन येऊ लागले. वैतागून मी फोन बंद केला. पण घरातल्या मंडळींना फोन येऊ लागल्याने मी फोन चालू केला तेव्हा दादा प्रेमींनी, तुम्ही लढलेच पाहिजे, आता माघार नाही. आम्ही पूर्ण ताकतीने तुमच्या बरोबर आहोत. यावेळी विजयाचा गुलाल अंगाला लावायचा असा निर्धार सर्वांनीच व्यक्त केल्याने शेवटी मी लढण्यासाठी मैदानात उतरलो आहे. माझी निवडणूक ही माझी नसून माझ्या काँग्रेस पक्षाची, दादा प्रेमींची आणि माझ्या मतदारांची आहे, त्यामुळे मला मिळणारा प्रतिसाद पाहता माझा विजय पक्का असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.
विद्यमान खासदार संजय काकांवर घणाघात करताना विशाल पाटील म्हणाले की, सध्याचे खासदार जत भागात जास्त दिसतात. याचे कारण जत मध्ये दोन-तीन मठ आहे आणि तेथे जाऊन माझ्यासमोर विशाल पाटील यांची उमेदवारी नको, असे देवाला साखळी घालत आहेत. ते मोठे देव फक्त आहेत. परंतु रावण हे शंकराचे मोठा भक्त होता. त्याला अहंकार झाल्याने, त्याचा अंत झाला. विद्यमान खासदारांचाही त्यांच्या अहंकारानेच नाश होणार आहे.